परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रवेश : निकालपत्रकासंबंधी शिक्षण खात्याकडून मार्गसूची प्रसिद्ध : उन्हाळी सुटीची घोषणा
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोनाची दुसरी लाट तीव्र होत असल्याने राज्य शिक्षण खात्याने पहिली ते नववीपर्यंतच्या वार्षिक परीक्षाच रद्द केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश मिळणार आहे. मंगळवारी यासंबंधीचा आदेश जारी करण्यात आला असून विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन आणि उन्हाळी सुटीसंबंधीची मार्गसूची घोषित करण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत शाळांमध्ये झालेल्या परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमांमधील प्रतिसाद यांच्या आधारे मूल्यमापन करून 30 एप्रिलपर्यंत निकालपत्रक तयार करण्याची सूचना शाळांना देण्यात आली आहे.
चार दिवसांपूर्वी डीएसईआरटी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शिक्षणमंत्र्यांनी चर्चा केली होती. कोरोनाची दुसरी लाट तीव्र झाल्याने पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला होता. मात्र, शिक्षण खात्याने दहावी आणि बारावी परीक्षा रद्द केलेल्या नाहीत. सध्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे 21 जून ते 5 जुलै या कालावधीत दहावी परीक्षा घेतल्या जाणार असल्याचे शिक्षण खात्याने आदेशपत्रकात स्पष्ट केले आहे.
कोरोना परिस्थितीमुळे पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग शाळांमध्ये भरविण्यात आलेले नाहीत. तर सहावी ते नववीपर्यंतचे वर्ग जानेवारीपासून सुरू करण्यात आले होते. आतापर्यंत शाळांमध्ये अध्ययन प्रक्रिया, ऑनलाईन वर्ग आणि विद्यागम प्रणालीनुसार विद्यार्थ्यांची चाईल्ड प्रोफाईल, प्रोजेक्ट, संवाद, होमवर्क व इतर उपलब्ध माहितीच्या आधारे तसेच आतापर्यंत शिकविलेल्या अभ्यासक्रमाच्या आधारे सीसीई नियमाप्रमाणे मूल्यमापन करून निकालपत्रक तयार करावेत. ही प्रक्रिया 30 एप्रिलपूर्वी पूर्ण करावी, अशी सूचना शाळांना देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून मूल्यमापन करू नये, अशी सक्त सूचनाही करण्यात आली आहे. पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पातळीवरील प्रगतीचे विश्लेषण करून पुढील वर्गात प्रवेश दिला जावा. तर सहावी ते नववीपर्यंतचे विद्यार्थी ऑफलाईन आणि ऑनलाईन वर्गांना हजर झाले होते. चंदन वाहिनीवरील शैक्षणिक कार्यक्रम, संवेद आणि अध्ययनपुरक कार्यक्रमांच्या आधारे रुपनात्मक आणि संकलनात्मक मूल्यमापन करण्याची सूचना देण्यात आली आहे.
पहिली ते नववीपर्यंतच्या मुलांच्या अध्ययनामध्ये त्रुटी दिसून आल्यास त्याची नेंद करावी. पुढील शैक्षणिक वर्षावेळी नैदानिक परीक्षा घेऊन अध्ययन पातळी निश्चित करून सेतूबंध कार्यक्रम हाती घ्यावा. नंतर साफल्य परीक्षा घेतल्यानंतरच पुढील वर्गातील अभ्यासक्रम शिकविण्यास सुरुवात करावी, अशी सूचना देण्यात आली आहे.
पहिली ते सातवी, आठवी वर्ग असणाऱया प्राथमिक शाळांना 1 मे ते 14 जूनपर्यंत उन्हाळी सुटी घोषित करण्यात आली आहे. तर 15 जूनपासून 2021-22 या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होणार आहे. तर आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांना 1 मेपासून 14 जुलैपर्यंत सुटी देण्यात आली आहे. माध्यमिक शालेय शिक्षकांना 15 जून ते 14 जुलैपर्यंत सुटी असणार आहे. दहावी परीक्षेचे मूल्यमापन पूर्ण झाल्यानंतर 15 जुलैपासून माध्यमिक शाळा सुरू होणार आहेत. हे वेळापत्रक तात्पुरते असून कोरोना परिस्थिती विचारात घेऊन त्यामध्ये बदलही होण्याची शक्यता आहे.
सुटय़ांचा आदेश अवैज्ञानिक?
राज्य सरकारने नववीपर्यंतच्या परीक्षा रद्द केल्या असून उन्हाळी सुटीची घोषणाही केली आहे. प्राथमिक शालेय शिक्षकांना 15 जूनपर्यंत सुटी जाहीर केली आहे. तर माध्यमिक शालेय शिक्षकांना 15 जूनपासून सुटी घोषित करण्यात आली आहे. हा अवैज्ञानिक पद्धतीने घेतलेला निर्णय असल्याचे काही शिक्षकांचे म्हणणे आहे. मात्र, दहावी विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि परीक्षांचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे समजते.









