673 पैकी 331 जणांना डिस्चार्ज : मृतांचा आकडा 29 : 22 नव्या रुग्णांची भर
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने भीतीच्या छायेखाली वावरत असलेल्या जनतेला काही प्रमाणात दिलासाही मिळाला आहे. राज्यात पॉझिटिव्ह रुग्ण आढळणाऱया रुग्णसंख्येपेक्षा संसर्गमुक्त होणाऱयांची संख्या अधिक आहे. राज्यात आतापर्यंत 673 पैकी 331 रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत. तर केवळ 312 जणांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात मंगळवारी 22 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 673 वर पोहोचली आहे. मृतांमध्ये आणखी दोघांची भर पडल्यामुळे मृतांचा एकूण आकडा 29 वर पोहोचला असून एकाने आत्महत्या केली आहे. दुसरीकडे 331 जण संसर्गमुक्त झाले आहेत. मंगळवारी बागलकोट, विजापूर आणि म्हैसूर जिल्हय़ात प्रत्येकी तिघेजण तर गुलबर्गा जिल्हय़ात एक रुग्ण संसर्गमुक्त झाला आहे. या सर्वांना इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दावणगेरेत आणखी 12 नवे रुग्ण
ग्रीन झोनच्या जिल्हय़ांची संख्या वाढत असताना दावणगेरे, हावेरी, कारवार जिल्हय़ांमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवारी दावणगेरेत पुन्हा 12 नवे रुग्ण आढळले. तर बेंगळूर शहर जिल्हय़ात 3, बागलकोटमध्ये 2 तसेच कारवार (भटकळ), बळ्ळारी, मंगळूर, हावेरी आणि धारवाड जिल्हय़ांत प्रत्येकी 1 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. मागील आठवडय़ात ग्रीन झोनमध्ये असलेल्या दावणगेरे जिल्हय़ात मागील तीन दिवसांत 33 नव्या रुग्णांची भर पडली आहे. हे सर्वजण कोरोनाबाधित परिचारिकेच्या संपर्कात आले होते. यातील 22 जण बाशानगर येथील रहिवासी आहेत. जिल्हय़ातील एकूण रुग्णसंख्या 44 वर पोहोचली आहे.
बागलकोटमध्ये 29 वर्षीय युवक आणि 29 वर्षीय महिलेला रुग्ण क्रमांक 367 व 368 च्या संपर्कात आल्याने कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर बागलकोट जिल्हा इस्पितळात उपचार केले जात आहेत. हावेरी जिल्हय़ाच्या सवनूर येथील 40 वर्षीय पुरुषाला रुग्ण क्रमांक 639 च्या संपर्कात आल्याने बाधा झाली आहे. कारवार जिल्हय़ातील भटकळ येथील 18 वर्षीय युवती, बळ्ळारीत 43 वर्षीय पुरुषाला आणि मंगळूर जिल्हय़ातील 51 वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे.
बेंगळुरातही आकडा वाढला
बेंगळूर शहर जिल्हय़ात 3 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये 30 वर्षीय महिला, 34 आणि 45 वर्षीय पुरुषांना कोरोनाची लागण झाली आहे. या जिल्हय़ातील रुग्णसंख्या 153 वर पोहोचली असून त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 75 जण संसर्गमुक्त झाले आहेत.
धारवाडमध्ये तरुणाला लागण
हुबळी : धारवाड जिल्हय़ात मंगळवारी 26 वर्षीय युवकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपा चोळण यांनी दिली आहे. खोकला, ताप आणि सर्दीमुळे त्याला हुबळीतील किम्स इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्याच्या स्वॅबची तपासणी केली असता त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. हा युवक नवलूर येथील पठाण गल्लीतील रहिवासी आहे. तो काही दिवसांपूर्वी मुंबईवरून परतला होता. सध्या जिल्हय़ात 11 रुग्ण आढळले असून त्यापैकी 6 जण बरे झाले आहेत.
कोरोनाचे आणखी दोन बळी
मंगळवारी विजापूर आणि दावणगेरेमध्ये प्रत्येकी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोमवारीही दोघांचा बळी गेला होता. आता त्यात आणखी भर पडल्याने राज्यातील कोरोनाग्रस्त मृतांची संख्या 29 झाली आहे. दावणगेरेत सोमवारी एका 48 वर्षीय महिलेचा कोरानामुळे मृत्यू झाला होता. मंगळवारी आणखी एक 50 वर्षीय महिला दगावली आहे. त्यामुळे या जिल्हय़ातील मृतांची संख्या 3 वर पोहोचली आहे. सकाळी विजापूरमध्ये 62 वर्षीय वृद्धेचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. या जिल्हय़ातही आतापर्यंत तिघांचे बळी गेले आहेत.









