सरकारकडून नवी नियमावली
बेंगळूर : व्यापारी, लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे राज्य सरकारने केरळच्या सीमेवरील काही जिल्हय़ांमध्ये लागू केलेला विकेंड कर्फ्यू रद्द केला आहे. मात्र, कोरोना अद्याप पूर्णपणे नियंत्रणात आलेला नसल्याने राज्यभरात लागू केलेला नाईट कर्फ्यू यापुढेही जारी ठेवण्यात आला आहे. यासंबंधीची नवी नियमावली गुरुवारी जारी करण्यात आली आहे. जिल्हय़ातील कोरोना परिस्थिती विचारात घेऊन विकेंड कर्फ्यू लागू करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले आहेत. सदर नियमावली 27 सप्टेंबर रोजी सकाळी 6 पर्यंत लागू असणार आहे.
राज्य सरकारचे मुख्य सचिव पी. रवीकुमार यांनी यासंबंधीचा आदेश दिला असून मंगळूर, उडुपी, हासन व चिक्कमंगळूर जिल्हय़ांमधील विकेंड कर्फ्यू रद्द करण्यात आला आहे. सध्या राज्यात कोरोना पॉझिटिव्हिटी दर 0.63 टक्के इतका आहे. याआधी विकेंड कर्फ्यू लागू केलेल्या केरळ सीमेवरील जिल्हय़ांतील पॉझिटिव्हिटी दरही 2 टक्क्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे तेथील विकेंड कर्फ्यू रद्द करण्यात आला आहे.
रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत नाईट कर्फ्यू
राज्य सरकारने याआधी जारी केलेल्या कोविड-19 नियमावलीची मुदत सोमवार दि. 13 रोजी संपणार आहे. त्यामुळे शुक्रवार ते शनिवार शासकीय सुटी असल्याने राज्य सरकारने तीन दिवस अगोदरच नवी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार राज्यात रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत दररोज नाईट कर्फ्यू जारीच राहणार आहे. या कालावधीत वैद्यकीय सेवेसह तातडीच्या सेवा, मालवाहतूक सुरू राहणार आहे. रात्रीच्या वेळी कामावर जाणारे किंवा कामावरून परतणाऱया कर्मचाऱयांना कंपनीचा पास स्वतःजवळ बाळगावा लागणार आहे. कोरोना नियमांचे पालनही करावे लागणार आहे.









