ब्रिटनमधून परतलेल्या आठ प्रवाशांमध्ये लक्षणे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ट्विटरवर माहिती
प्रतिनिधी/मुंबई
ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने जगात खळबळ उडवून दिली आहे. आता महाराष्ट्रातही कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आठ रुग्ण आढळून आले आहेत. ब्रिटनहून परतलेल्या प्रवाशांमध्ये ही लक्षणे आढळून आली आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरवरुन दिली आहे. यामुळे राज्याभरात पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.
या आठ रुग्णांपैकी मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदरमधील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. हे सर्व विलगीकरण कक्षात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरु आहे, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.
डिसेंबर महिन्यात ब्रिटनमधून भारतात परतलेल्या रुग्णांमध्ये करोनाचा नवा स्ट्रेन आढळला असला तरी राज्यात करोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण नसल्याने दिलासा होता. तरीही आरोग्य विभागाने शोध मोहीम जारी ठेवली होती. शिवाय नव्या करोना टाळण्यासाठी 21 डिसेंबरपासून विमानांवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर या कालावधीत भारतात व राज्यात दाखल झालेल्या रुग्णांची आरटी -पीसीआर चाचणी करण्यात येत होती. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आढावा बैठक घेऊन राज्यात करोनाच्या नवीन स्ट्रेनची लागण झालेल्या रुग्णांबाबतही चर्चा केली. त्याबाबत आरोग्य विभाग व मनपा आयुक्त यांच्याशी चर्चा केली व अधिक दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान कोरोनाच्या नव्या विषाणूचा देशात आत्तापर्यंत 38 लोकांना संसर्ग झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली. कोरोनाचा हा नवा विषाणू सर्वप्रथम ब्रिटनमध्ये आढळून आला होता. हा विषाणू पूर्वीच्या कोरोना विषाणूपेक्षा 70 टक्के अधिक संसर्गजन्य आहे.








