प्रतिनिधी/ पणजी
राज्यात अद्याप कोरोना महामारीचे सावट असले तरीही दिवाळी उत्सवास मोठय़ा हर्षोल्हासात व पारंपरिक श्रद्धेने साजरा करण्यास प्रारंभ झाला. लोकांनी विविध माध्यमांद्वारे एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. राज्यभरात सर्वत्र आनंदी वातावरण दिसून आले. सायंकाळी प्रत्येक घरात आणि सर्व व्यावसायिक आस्थापने, दुकाने, कार्यालयात श्रीलक्ष्मीपूजनोत्सव साजरा करण्यात आला.
पहाटे नरकासुराचा वध केल्यानंतर सर्वांनी सुगंधी उटणे लावून अभ्यंगस्नान केले. आकाशकंदील पेटविले, घरासमोर दिव्यांची आरास केली. नंतर पोह्यांपासून बनविलेल्या विविध प्रकारच्या गोडधोड पदार्थांचा फराळ केला.
सायंकाळी सर्वांनी श्रीलक्ष्मीपूजन केले. उद्या सोमवारी बलिप्रतिपदा, पाडवा आणि भाऊबीज साजरा होणार आहे.
दरम्यान, दीपोत्सवाचा आनंद घेताना प्रत्येकांनी स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपापल्या संदेशात केले आहे.









