बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यातील साठवण सुविधांविषयी स्पष्टीकरण देताना कर्नाटकचे आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी लस साठवण आणि वितरणासाठी कर्नाटकात जवळपास २,८५५ कोल्ड साखळी स्टोरेज असल्याचे सांगितले. चांगल्या पुरवठा साखळीचे जाळे व्हावे आणि वेळेत लसींचे वितरण व्हावे या उद्देशाने बेंगळूर शहरी, शिवमोगा आणि बळ्ळारी या तीन ठिकाणी नवीन प्रादेशिक लसी स्टोअर प्रस्तावित आहेत. या नव्याने प्रस्तावित प्रादेशिक लस स्टोअरमध्ये अतिरिक्त वॉक-इन-कूलर आणि वॉक-इन-फ्रीझर पुरवठा करण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.
मंत्री सुधाकर यांनी लस स्टोअरचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे. राज्यात १० वॉक-इन-कूलर आणि ४ वॉक-इन-फ्रीझर आहेत. कोरोना लस कार्यक्रमासाठी आवश्यक कोल्ड स्टोरेज क्षमतेचे अचूक आकलन करण्यासाठी, प्रत्येक कुपीमध्ये डोसची संख्या, कुपीची मात्रा इत्यादींचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. आम्ही आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाला यापूर्वी ही माहिती सामायिक करण्यास विनंती केली आहे, असे डॉ.सुधाकर म्हणाले.
कोरड्या साठवण सुविधेबाबत मंत्री सुधाकर यांनी, लस कार्यक्रमासाठी राज्यात साठवण जागेचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. तसेच भारत सरकारने युनिव्हर्सल लसीकरण कार्यक्रमाच्या निकषानुसार यापूर्वीच काही डीप फ्रीझर आणि आईस लाइन रेफ्रिजरेटरचे वाटप केले आहे. आम्ही आमच्या अतिरिक्त आवश्यकतांसाठी भारत सरकारलाही कळविले आहे, असे ते म्हणाले.