आरोग्य खात्याकडून माहिती : केंद्र सरकारकडून अनुमती : देशभरात शनिवारपासूनच दुसरा डोस देण्यास प्रारंभ
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोना लसीचा दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सोमवार 15 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य खात्याने दिली आहे. देशभरात शनिवारपासूनच दुसरा डोस देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेल्यांना 28 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाणार आहे.
राज्यातील विविध लसीकरण केंद्रात पहिला डोस 16 जानेवारीला देण्यात आला होता. त्यानुसार 14 फेब्रुवारीला दुसरा डोस देणे गरजेचे होते. मात्र, सोमवारपासून राज्यभरात दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. एक-दोन दिवसांच्या फरकाने डोस घेतल्यास कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. परंतु पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस घेणे अनिवार्य आहे. एकाद्यावेळेस दुसरा डोस न घेतल्यास रोगप्रतिकारक शक्तीची उत्पत्ती होत नाही, असे आरोग्य खात्याचे उपसचिव डॉ. बी. एन. रजनी यांनी सांगितले.
राज्यात लसीकरणाच्या पहिल्या दिवशी 243 लसीकरण केंद्रांतून 13 हजार जणांना पहिला डोस देण्यात आला होता. पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस घेण्याची सूचना आरोग्य खात्याने लाभार्थींना केली होती. मात्र, केंद्र सरकारने याबाबत मार्गसूची जारी केली नव्हती. पण, शनिवारी केंद्र सरकारने राज्य सरकारच्या अधिकाऱयांची बैठक घेऊन दुसरा डोस देण्याची अनुमती दिली आहे.
राज्य सरकारने शनिवारी 21,606 आरोग्य कर्मचाऱयांना कोरोना लस देण्याची यादी तयार केली होती. मात्र, केवळ 1,231 जण उपस्थित राहून लस घेतली. यानुसार केवळ 9 टक्के कर्मचारीच लसीकरणासाठी हजर झाले होते. उर्वरित कर्मचारी विविध कारणे सांगत गैरहजर राहिले. गत 14 दिवसांत राज्यात 5,883 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. या कालावधीत दररोज सरासरी 420 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 9.45 लाख इतकी झाली असून मृतांची संख्या 12,265 वर पोहोचली आहे. तर 9.27 लाख जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यातील विविध रुग्णालयात 5,836 बाधितांवर उपचार सुरू आहेत. यापैकी 132 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1.79 कोटी जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.









