बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णवाढीचे चक्र सुरूच आहे. प्रशासन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. राज्यात कोरोनाविषयक कडक नियमावली लागू केली आहे. राज्य सरकार कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करत आहे. परंतु तरीही कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. दरम्यान शुक्रवारी कर्नाटकात नवीन प्रकरणांची संख्या वाढली. कोरोनाने ८ हजारापर्यंत मजल मारली. शुक्रवारी राज्यात ७,९५५ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर राज्यात गेल्या २४ तासांत ४६ संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार ३,२२० रूग्ण बरे झाल्यानंतर घरी परत आले आहेत.
यासह राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ५८,०८४ झाली आहे. शुक्रवारपर्यंत राज्यात कोविडमुळे एकूण १२,८१३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाची सर्वाधिक नवीन प्रकरणे आढळली आहेत. शुक्रवारी जिल्ह्यात ५,५७६ रुग्णांची भर पडली आहे. तर १,९६८ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परत आले आहेत. बेंगळूर शहरात आतापर्यंत कोरोनाच्या संसर्गामुळे ४,७६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.









