गत महिन्याभरात सुमारे 298 रुग्णांचा मृत्यू : सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे : परिस्थिती चिंताजनक
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोनाची दुसरी लाट मोठय़ा प्रमाणात पसरत असून रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. राज्यात दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. बुधवारी राज्यात 6976 रुग्णांची नोंद झाली असून 35 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यात मृत्यूचे प्रमाणही वाढले असून कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे मृत्यू दरात दुपटीने वाढ झाल्याचे स्थिती चिंताजनक बनली आहे. राज्यात 5 जानेवारी ते 5 एप्रिल अखेर मृत्यू दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गत महिन्याभरात राज्यात सुमारे 298 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेऊन कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे बनले आहे.
आरोग्य खात्याच्या आकडेवारीनुसार, 5 जानेवारी ते 5 फेब्रुवारीपर्यंत 112, 6 फेब्रुवारी ते 5 मार्चपर्यंत 121, 6 मार्च ते 5 एप्रिलपर्यंत 298 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गत काही महिन्यांमध्ये एसएलआय, सारी, मधुमेह, रक्तदाब, दीर्घ आजार असणाऱया 40 ते 90 वयोगटातील रुग्णांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
खासगी रुग्णालय व नर्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. एच. एम. प्रसन्न म्हणाले, रुग्णालयांमध्ये आयसीयू बेड्स वाढविण्यात येत आहेत. मात्र, कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर अनेक रुग्णालयांनी आयसीयू बेड्सची संख्या कमी केली होती. मात्र, आता दुसऱया लाटेत प्रत्येक वयोगटातील लोकांना बाधा होत असून बेड्सची संख्या वाढविण्यात येत आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱया लाटेत वयस्करांसह युवा वर्ग व मध्यमवर्गीयांमधील मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना तांत्रिक सल्ला समितीचे सदस्य गिरीधर बाबू म्हणाले, रुग्णालयांमध्ये नागरिकांची होणारी गर्दी टाळण्याबाबत सूचना करण्यात केल्या आहेत. नागरिकांनीही सहकार्य करून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी नियमांचे पालन करावे. आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर यांनी मृत्यूचे ऑडिट करण्याबाबत कोरोना तांत्रिक समितीला सल्ला दिला आहे. राज्यात कोरोनामुळे युवा वर्ग व मध्यमवर्गीयांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सदर बाब चिंताजनक असून याची कारणे शोधण्यासाठी मृत्यूचे ऑडिट फायदेशीर ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.