बेंगळूरमध्ये पत्रकाराला संसर्ग : बिहारी कामगारामुळे आणखी 9 जणांना लागण
प्रतिनिधी/ बेंगळूर
सीलडाऊन भागात वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या बेंगळूरमधील खासगी वृत्तवाहिनीच्या पत्रकारासह राज्यात शनिवारी 26 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 500 झाली आहे. मागील 24 तासात बेंगळूरमध्ये 13, बेळगावमध्ये 9, मंडय़ा, म्हैसूर, चिक्कबळ्ळापूर आणि मंगळूर जिल्हय़ात प्रत्येकी 1 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.
बेंगळूर शहरात बिहारी कामगारामुळे आतापर्यंत 25 जण कोरोनाग्रस्त झाले आहेत. शनिवारी 6 वर्षांच्या बालकासह 13 जणांना संसर्ग झाला आहे. मागील तीन दिवसात हे रुग्ण आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. बिहारी कामगार वास्तव्यास असलेला होंगसंद्र परिसर सीलडाऊन करण्यात आला असून 100 हून अधिक जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. आता हंपीनगर येथील एकाच कुटुंबातील तिघांना संसर्ग झाला आहे. या जिल्हय़ातील रुग्णसंख्या 133 वर पोहोचली आहे. त्यातील 4 जण मृत झाले असून 49 जण संसर्गमुक्त झाले आहेत.
प्रसारमाध्यम क्षेत्रात भीती
बेंगळूरच्या पादरायनपूर येथील सीलडाऊन भागासह शहरातील कोरोनाग्रस्त आढळलेल्या कंटेन्मेंट भागात वृत्तांकन केलेल्या एका खासगी कन्नड वृत्तवाहिनीच्या पत्रकारालाही कोरोना झाल्याने प्रसारमाध्यम क्षेत्रात भीती पसरली आहे. सदर पत्रकाराने सुरक्षेसंबंधी खबरदारी घेऊन देखील त्याला संसर्ग झाल्याचे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र आणि तामिळनाडूनमध्ये पत्रकारांना कोरोना झाल्याने कर्नाटक सरकारने राज्यातील पत्रकारांचीही वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंगळूरमध्ये बंटवाळ कोरोनाग्रस्त 67 वर्षीय वृद्धेच्या मुलीचा (वय 33) वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ती मुलगी पती विदेशात गेल्याने माहेरी आली होती. तिच्या आईला यापूर्वी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शेजारील महिलेमुळे संसर्ग झाला होता. चिक्कबळ्ळापूरमध्ये 18 वर्षीय युवकही कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. त्याने यापूर्वी आंध्रप्रदेशमधील अनंतपूर आणि हिंदूपुरा येथे प्रवास केला होता. त्यामुळे त्याला आंधप्रदेशमध्येच संसर्ग झाल्याचे समजते. मंडय़ा जिल्हय़ात 37 वर्षीय युवक तसेच म्हैसूरच्या नंजनगूड येथील 50 वर्षीय महिलेला देखील कोरोनाची लागण झाली आहे.









