मावळ/प्रतिनिधी
राज्य सरकारमधल्या तिन्ही पक्षांमध्ये विसंवाद असल्याची टीका केली जात असतानाच भाजपाकडून एक मोठं विधान करण्यात आलं आहे. भाजप आमदार आशिष शेलार आज पुण्याच्या मावळ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये भाजपाच्या पदाधिकारी-कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलत असताना त्यांनी राज्यात कधीही निवडणुका लागू शकतात असं विधान केल्यामुळे पुन्हा एकदा राज्यात निवडणुकांची चर्चा सुरू झाी आहे. आशिष शेलार यांच्या या विधानामुळे राज्याच तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
मावळ दौऱ्यावर असताना आशिष शेलार यांनी राज्यातील तिन्ही सत्ताधारी पक्षांवर टीका केली आहे. “ज्या पद्धतीने तीन पक्षांत आपापसात विसंवादाची रोज लढाई लागली आहे आणि त्या तीन पक्षातल्या दोन पक्षांचे जे संकेत आमच्याकडे येत आहेत, या सगळ्याचा अभ्यास केला तर अनुमान असं काढता येऊ शकतं की राज्यात केव्हाही निवडणूक लागू शकेल”, असं ते म्हणाले. “अशा परिस्थितीत जेव्हा निवडणूक लागेल, तेव्हा मावळमधला आमदार भाजपाचाच असला पाहिजे”, असं जाहीर आवाहन त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना केलं आहे.








