– गुरुवारच्या गोंधळानंतर शुक्रवारी मध्यरात्री निघाले आदेश, – पाच टप्प्यात निर्बंध हटविणार
प्रतिनिधी/मुंबई
कोरोनाच्या दुसऱया लाटेच्या प्रतिबंधासाठी 14 एप्रिलपासून पुकारण्यात आलेला लॉकडाऊन सोमवार (7) पासून पाच टप्प्यात मागे घेण्यात येणार आहे. गुरुवारी याबाबत गोंधळ झाल्यानंतर विचाराधीन असलेल्या अनलॉकबाबत सावध पावले टाकत आता सोमवारपासून काही ठिकाणी अनलॉक जाहीर करण्यात आला आहे. पाच टप्प्यात निर्बंध हटविण्यात येणार असून याबाबतचे आदेश शुक्रवारी मध्यरात्रीनंतर जाहीर करण्यात आले.
करोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली होती. कोणत्या टप्प्यात कोणता जिल्हा असणार आणि किती प्रमाणात निर्बंध हटविणार यासाठीचे निकष निश्चित करण्यात आल्याचेही वडेट्टीवार म्हणाले होते. मात्र, त्यांच्या घोषणेनंतर असा निर्णय झाला नसून प्रस्ताव विचारधीन असल्याचे सांगत सरकारने अनलॉकबद्दलची चर्चाच थांबविली होती. त्यावरून सरकारवर टीकेची झोड उठली होती. अखेर शुक्रवारी मध्यरात्री सरकारकडून अनलॉकचे आदेश जारी करण्यात आले.
पहिला टप्पा
कोरोना पॉझिटिव्हिटी दर 5 टक्के आणि ऑक्सिजन बेडचा वापर 25 टक्क्यांपेक्षा कमी असेल, अशा जिह्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश केला जाणार आहे.
काय सुरू राहणार?
सर्व प्रकारची दुकाने पूर्ववत सुरू होणार. मॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, नाटÎगफहेसुद्धा नियमितपणे सुरू होणार. रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी. लोकलसेवा पूर्ववत होईल. मात्र परिस्थितीनुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागास निर्बंध घालण्याची मुभा असेल. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली राहतील. वॉकिंग आणि सायकलिंगला परवानगी असेल. सर्व खासगी कार्यालये उघडण्याची मुभा. शासकीय कार्यालयेही 100 टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू राहतील. विविध खेळ, चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांनाही मुभा असेल. लग्नसोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावर कोणतेही बंधने नसतील. जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना परवानगी असेल. सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत असेल. या भागात जमावबंदीही नसेल.
जिल्हे
अहमदनगर, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, वर्धा.
दुसरा टप्पा
पॉझिटिव्हिटी दर 5 टक्के आणि 25 ते 40 टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड्सचा वापर असेल अशा जिह्यांचा समावेश या गटात केला जाणार आहे.
काय सुरू राहणार?
सर्व प्रकारची दुकाने पूर्णवेळ सुरू राहतील. मॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, नाटÎगफहे 50 टक्के क्षमतेने. रेस्टॉरंटही 50 टक्के क्षमतेने. लोकलसेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांसाठी. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली राहतील. वॉकिंग आणि सायकलिंगला परवानगी असेल. सर्व खासगी कार्यालये उघडण्याची परवानगी. शासकीय कार्यालयेही 100 टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू. विविध खेळांसाठी सकाळी 5 ते 9 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 अशी वेळ राहील. चित्रीकरण नियमितपणे करता येईल. सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांना 50 टक्के उपस्थितीची मर्यादा. लग्नसोहळÎासाठी हॉलमधील आसनक्षमतेच्या निम्मे किंवा जास्तीत जास्त 100 जणांच्या उपस्थितीची परवानगी. अंत्यविधीसाठी कोणतेही बंधन नसेल, बैठका, निवडणूक यावरही कोणतीच बंधने नसतील. जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना 50 टक्के क्षमतेने परवानगी. सार्वजनिक वाहतूक सेवा 100 टक्के क्षमतेने. आसन क्षमतेइतकेच प्रवासी. या भागात जमावबंदी लागू असेल.
समावेश जिल्हे –
औरंगाबाद, गडचिरोली, हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी.
तिसरा टप्पा
पॉझिटिव्हिटी दर 5 ते 10 टक्के किंवा 40 टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड व्यापलेले असतील अशा जिह्यांचा तिसऱया गटात समावेश केला जाणार आहे.
काय सुरु राहणार?
सर्व अत्यावश्यक दुकाने सायंकाळी 4 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मुभा असेल. इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत सुरू राहतील, वीपेंडला (शनिवार -रविवार) बंद राहतील.
समावेश जिल्हे –
अकोला, अमरावती, बीड, वाशिम, यवतमाळ, ठाणे
चौथा टप्पा
पॉझिटिव्हिटी दर 10 ते 20 टक्क्यांदरम्यान किंवा ऑक्सिजन बेड्सचा 60 टक्क्यांपेक्षा अधिक वापर आहे, असे जिल्हे चौथ्या टप्प्यात असणार आहेत.
काय सुरू राहणार?
अत्यावश्यक सेवेतील दुकाने चार वाजेपर्यंत सुरू राहतील तर अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने पूर्णपणे बंद राहणार आहेत.
जिल्हे
पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर.
पाचवा टप्पा
पॉझिटिव्हिटी दर 20 टक्क्यांपेक्षा अधिक किंवा 75 टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड्सचा वापर आहे, असे जिल्हे पाचव्या टप्प्यात समाविष्ट केले जाणार आहेत.
काय सुरू राहणार?
पाचव्या गटात अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. वीपेंडला मेडिकल सोडून बाकी सर्व दुकाने बंद राहतील.
तीन, चार आणि पाचव्या टप्प्यातील भागात इतरही अनेक निर्बंध कायम राहणार आहेत.
असा घेणार नेमका आढावा
दर गुरुवारी राज्यातील एकूण ऑक्सिजन बेड वापराचा आढावा राज्य सरकारकडून घेण्यात येईल. तसेच, जिल्हानिहाय पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सीची देखील माहिती जाहीर करण्यात येईल. यावेळी वर दिल्याप्रमाणे एकूण बेड ऑक्युपन्सीची परिस्थिती पाहून गटविभागणीसंदर्भात निर्णय घेतला जाईल. तसेच, संपूर्ण महाराष्ट्रात रुग्ण असणाऱया ऑक्सिजन बेडची संख्या वर दिलेल्या आकडÎांपेक्षा कमी असेल, तर सध्याच्या 5 गटांच्या निकषांप्रमाणेच त्या त्या जिह्याचे आणि महानगरपालिकांचे वर्गीकरण करण्यात येईल. दर गुरुवारी आढावा घेतल्यानंतर त्यापुढे येणाऱया सोमवारपासून नवीन वर्गीकरण आणि त्यानुसारचे नियम लागू केले जातील, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
11 महानगरपालिकांसाठी स्वतंत्र निकष!
काही महानगरपालिका आणि त्या असणारे जिल्हे हे स्वतंत्र प्रशासकीय युनिट म्हणून गणले जाणार आहेत. मुंबई महानगर पालिका, पुणे महानगर पालिका, ठाणे महानगर पालिका, नाशिक महानगर पालिका, पिंपरी -चिंचवड महानगर पालिका, औरंगाबाद महानगर पालिका, वसई -विरार महानगर पालिका, नवी मुंबई महानगर पालिका, नागपूर महानगर पालिका, सोलापूर महानगर पालिका आणि कल्याण -डोंबिवली महानगर पालिका यांच्यासाठी स्वतंत्रपणे निकष लावून त्यांची वर्गवारी 5 गटांमध्ये केली जाईल. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर वगळता उर्वरीत 34 जिह्यांना स्वतंत्र युनिट म्हणून गणलं जाईल. त्या प्रत्येक जिह्याची वर्गवारी संपूर्ण जिह्यासाठीचे निकष लावून केली जाईल.