प्रतिनिधी/ पणजी
राज्यात महाप्रलय आलेल्या जुलैमध्ये 51 इंच एवढी विक्रमी पावसाची नोंद झाली. 31 जुलैपर्यंत राज्यात मोसमी पावसाची एकंदर नोंद 89.61 इंच एवढी झाली आहे. गेल्या दोन दिवसांत पावसाचे प्रमाण कमी झाले असून शनिवारी राज्यात अत्यल्प पाऊस पडला.
राज्यात जून, जुलैमध्ये मिळून 89.61 इंच एवढी पावसाची नोंद झाली आहे. अद्याप ऑगस्ट व सप्टेंबर असे पावसाचे दोन महिने शिल्लक आहेत. वार्षिक सरासरीच्या तुलनेत तो 10 इंचाने जास्त आहे. यावर्षी 160 इंच सुमार पावसाची नोंद शक्य आहे. ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांत राज्यात जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. यावर्षी तौक्ते वादळामुळे मेच्या 15 तारखेलाच पावसाला प्रारंभ झाला होता. मान्सूनपूर्व असा सुमारे 20 इंच पाऊस या काळात झाला होता.
यापूर्वी गोव्यात वार्षिक सरासरी साधारणपणे 110 ते 120 इंच एवढा पाऊस पडायचा. गेल्या चार वर्षांत पावसाचे सरासरी प्रमाण 150 इंच एवढे झालेले आहे. जुलैअखेर राज्यात 89 इंच पाऊस पडला. जूनमध्ये साधारणतः 28 इंच पावसाची नोंद झाली आहे.









