कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह राज्यभर पावसाचा अंदाज
पुणे/ प्रतिनिधी
पश्चिम विदर्भ ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत अंतर्गत कर्नाटक मार्गे उत्तर दक्षिण कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, तर दक्षिण महाराष्ट्र व लगतच्या भागावर चक्रीय चक्रावाताची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी राज्याच्या काही भागात पूर्व मोसमी पाऊस होत आहे. पुढचे चार दिवस पावसाचे हे सत्र कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्याच्या काही भागात सकाळपासूनच ऊन व सावलीचा खेळ सुरू होता. दुपारनंतर आभाळ भरून आले नि मेघगर्जनेसह व विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. पुणे व पिंपरी चिंचवड शहरात जवळपास तासभर जोरदार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्राबरोबरच मराठवाड्याच्या काही भागातही पावसाची नोंद झाली. पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. दुसरीकडे कोकण व गोव्यात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे, तर राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.
मध्य महाराष्ट्रात गारांचा पाऊस पडणार
शुक्रवारी कोकण गोव्याच्या काही भागात मेघगर्जनेसह, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱयासह पावसाचा अंदाज आहे, तर शनिवारी कोकण-गोवा व विदर्भात मेघगर्जनेसह तसेच मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात गारांचा पाऊस पडेल. रविवारी व सोमवारीही या भागात पावसाचे सत्र कायम राहील, अशी शक्मयता हवामान विभागाने वर्तविली आहे.








