प्रतिनिधी/ पणजी
राज्यात आज रविवारी व उद्या सोमवारी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे असून गोव्याला रेडझोन जाहीर केला आहे. प. बंगालच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले असून त्याचा विपरित परिणाम अरबी समुद्रापर्यंत होऊ शकतो. यामुळेच गोव्यासह किनारपट्टीवरील सर्वच राज्यांना इशारा दिलेला आहे.
गोव्यात सर्वत्र मुसळधार पाऊस व अतिजोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. प. बंगालमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेला आहे व त्याचा परिणाम गोव्यावर झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. गेल्या 24 तासांत सांगेमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. आज व उद्या सोमवारी राज्यात जोरदार वादळी वाऱयासह अतिमुसळधार वृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे.
शनिवारपासून पुढील 5 दिवस गोव्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडेल. बंगालमधील कमी दाबाचा पट्टा छत्तीसगडपर्यंत येईल, त्याचबरोबर गोव्यापर्यंत मुसळधार पाऊस पडणार. 12 सें.मी. पेक्षाही जादा पाऊस दि. 15 रोजी पडू शकतो. 20 सें.मी. पर्यंतचा पाऊस 14 किंवा 15 जून रोजी एका दिवसात पडू शकतो. या पार्श्वभूमीवर आजपासून गोव्यात ऑरेंज झोनच इशारा दिला आहे, तर दि. 14 व 15 जूनसाठी गोव्यात रेड झोन जाहीर करण्यात आला आहे.
मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये
या पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पूर येण्याची भीती तसेच अनेक भागात रस्त्यावर पाणी साचण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली. समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असे कळविले आहे. गेली 24 तासांत सांगे सुमारे 3 इंच, म्हापसा, पेडणे, काणकोण या ठिकाणी प्रत्येकी 2 इंच, फोंडा दीड इंच, पणजी, जुने गोवे, सांखळी आदी ठिकाणी 1 इंच तर दाबोळीत अर्धा इंच एवढी पावसाची नोंद झाली. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या इशाऱयानुसार गोवा प्रशासनानेदेखील पावसामुळे उद्भवणाऱया परिस्थितीशी सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवली आहे.









