प्रतिनिधी/ पणजी
आज आश्विन शुक्ल प्रतिपदा, अर्थात नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस, घटस्थापना! आजपासून गोव्यात सर्वत्र नवरात्रौत्सव सुरू होत आहे. तथापि, राज्यातील सर्व मंदिरात हा उत्सव होणार असला तरी भाविकांना मात्र मंदिरात जाण्यास बंदी असल्याने आपल्या आवडत्या देवतेचे दर्शन तसेच मंदिरातील पारंपरिक मखरोत्सव ऑनलाईनद्वारेच पाहता येणार आहे.
गोव्याच्या उत्सव परंपरेतील मानाचे स्थान असलेल्या नवरात्रौत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. कोरोना महामारीचा वाढता फैलाव लक्षात घेऊन मंदिरे खुली करण्यास अद्याप अधिकृत परवानगी देण्यात आलेली नाही. मंदिरात लागलीच भाविक गर्दी करण्याची शक्यता गृहीत धरून बहुतांश मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने हा उत्सव होईल. मात्र भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. राज्यात आज अनेक मंदिरांमध्ये सकाळपासून घटस्थापना तसेच नवरात्रौत्सवानिमित्त धार्मिक कार्याला प्रारंभ होणार आहे. वार्षिक कीर्तन परंपरा अनेक मंदिरांनी यावर्षी खंडित केली आहे. काही मंदिरांमध्ये केवळ महाजनांनाच प्रवेश दिला जाईल. तिथे कीर्तन व रात्री मखरोत्सव होइल. यंदा अनेक मंदिरांतील मखरोत्सव ऑनलाईनद्वारे पाहता येईल, अशी व्यवस्था मंदिर समित्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवरात्रीच्या शुभ मुहुर्तावर गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. या कोविड-19 महामारीच्या कठीण प्रसंगी या समस्येवर मात करण्यासाठी आपण माँ दुर्गेकडे बळ आणि धैर्यासाठी प्रार्थना करतो, असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.









