लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज, तुलशीविवाह, आदी सणांची रेलचेल : पावसामुळे नरकासुर भिजले, सर्वांचाच मनोभंग
प्रतिनिधी /पणजी
गेल्या कित्येक दिवसांपासून कोसळणाऱया पावसाने दिवाळीच्या आदल्या दिवशी मात्र उसंत घेतल्यामुळे लोकांच्या आनंदाला उधाण आले. त्याच आनंदात आज पहाटे नरकासुर दहन करुन व अभ्यंगस्नानादी कार्यक्रम आटोपल्यानंतर पोहय़ांच्या गोड-तिखट पदार्थांचा आस्वाद घेत लोकांनी मोठय़ा उत्साहात दिवाळी साजरी केली. त्यानंतर विविध माध्यमांद्वारे सर्वांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. त्याद्वारे दिव्यांचा मांगल्यरुपी सण दीपावलीला मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला.
राज्यात दरवर्षी दिवाळी आणि त्यानंतर येणारे लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज, तुलशीविवाह आदी सण मोठय़ा उत्साहात साजरे करण्यात येतात. दिवाळीच्या आदल्या दिवशी गावोगावी, गल्लोगल्ली भव्य नरकासुर प्रतिमा बनविल्या जातात. पहाटे त्यांचे दहन करून अभ्यंगस्नानादी कार्यक्रम आटोपल्यानंतर आकाशकंदील लावून दिवाळीचा उत्साह द्विगुणीत करण्यात येतो.
नरकासुर प्रतिमा दहन हे दिवाळीचे वैशिष्टय़
नरकासुर प्रतिमा बनवून त्यांचे दहन करणे हे दिवाळी उत्सवाचे वैशिष्टय़ मानले जाते. यंदा मात्र दिवाळीच्या काही दिवस आधीपासून रोज सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळत राहिल्याने अनेक प्रतिमा भिजून खराब झाल्या. त्यामुळे रात्रंदिवस झटून नरकासुर प्रतिमा बनविणाऱया बालगोपाळांचे श्रम वाया जातात की काय अशी चिंता सतावत होती. मात्र दिवाळीच्या आदल्या दिवशी पावसाने उसंत घेतल्यामुळे सर्वांच्याच चेहऱयावर उत्साह दिसून आला. नरकासुर प्रतिमांच्या कामानांही वेग आला.
पावसामुळे सोमवार, मंगळवारी बाजारपेठांवरही मंदीची छाया होती. मात्र बुधवारी पाऊस कमी झाल्यामुळे लोकांनी उत्साहात खरेदी केली. राजधानी पणजीसह जवळजवळ सर्वच बाजारपेठा प्रचंड गर्दीने फुलून गेल्या होत्या. लोकांनी मोठय़ा प्रमाणात झेंडू फुले, उटणे, सुगंधी तेल, सुवासिक साबण, चिरमुऱया, पोहे, लक्ष्मीपूजनासाठी विविध प्रकारची फळे, पूजा साहित्य, पणत्या, आकाशकंदील यांची खरेदी केली. त्यातून निदान दिवाळीच्या पूर्वसंध्येला तरी समाधानकारक व्यवसाय झाल्यामुळे व्यापाऱयांच्याही चेहऱयावर हास्य दिसत होते.
घरोघरी झगमगाट
दिवाळी म्हणजेच दीपोत्सव किंवा दिव्यांचा उत्सव. दारी झेंडू फुलांचे तोरण, दरवाजासमोर मोठा आकाशकंदील, आकर्षक रांगोळी, विद्युतरोषणाई आणि सर्वत्र पणत्यांची आरास करून दीपोत्सव साजरा करण्यात येतो.
यंदा आज गुरुवारी दिवाळीच्या दिवशीच लक्ष्मीपूजनोत्सही साजरा करण्यात येणार आहे. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनापासून प्रारंभ होते. व्यापारीवर्गाने आपापल्या आस्थापनात आज लक्ष्मी पूजनाची जय्यत तयारी केली आहे. सायंकाळी लक्ष्मी पूजनाबरोबरच नव्या हिशेब वहीचेही हळद, कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजन करण्यात येणार आहे.
या दिवशी पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी वा तबक ठेऊन त्यात सोने, चांदी, मोत्यांचे दागिने ठेवून पूजा करतात. या पूजेकरता झेंडूची फुले, चिरमुऱया, गूळ, हळद, कुंकू, अगरबत्ती, मिठाई इत्यादी साहित्य वापरले जाते. हा दिवस व्यापारी लोक मोठय़ा उत्साहात साजरा करतात.
शुक्रवारी बलिप्रतिपदा – पाडवा
उद्या शुक्रवारी कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच पाडवा साजरा करण्यात येणार आहे. दानशूर बळी राजाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो. या दिवशी ग्रामीण भागात गुरांची पूजा करण्यात येते. अंगणात शेण सारवण करून शेणाचाच गोठा बनविण्यात येतो. त्यात कारीट या फळाला केरसुणीचे व्हीर टोचून गुरांच्या प्रतिकृती बनविण्यात येतात. त्यात बळीची प्रतिकृती तयार करण्यात येतो. गावात त्या दिवशी धेंडलो फिरविण्यात येतो. धेंडलो पाडव्यापासून पाऊस संपतो अशी धारणा आहे. त्यामुळे धेंडलो फिरवताना, ‘धे धेणलो, धेंणल्या पावस शेणलो’, हे पारंपरिक लोकगीत म्हटले जाते. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे या दिवशी सोने, चांदीचे दागदागिने, वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू अन्य उपकरणे यांची खरेदी मोठय़ा प्रमाणात करण्यात येते.
बहीण-भावाच्या अतुट नात्याची भाऊबीज
शनिवार दि. 6 रोजी यमद्वितीया म्हणजेच भाऊबीज साजरी करण्यात येणार आहे. बहिण-भाऊ यांच्यातील अतुट नात्याचा हा सण. या दिवशी भाऊ आपल्या विवाहित बहिणीला भेटायला जातो. तेथे ती त्याचे औक्षण-ओवाळणी करते. त्यावेळी आपल्या ऐपतीनुसार तो तिला पैसे किंवा एखादी भेटवस्तू देतो.
तुलशी विवाहाने दीपावलीची समाप्ती होते. दि. 15 ते 19 नोव्हेंबर दरम्यान तुलशी विवाह साजरा करण्यात येणार आहे. तेथून मग पुढे विवाह सोहळय़ांना प्रारंभ होतो.
स्पर्धांचीही रेलचेल
राज्यात प्रत्येक सण उत्सवात परंपरेसोबतच हल्लीच्या काही वर्षात स्पर्धांचेही महत्त्व वाढू लागले आहे. स्पर्धेशिवाय उत्सवात रंगत येत नाही अशीच धारणा झाल्याने उत्सवांच्या जोडीनेच स्पर्धाही वाढीस लागल्या आहेत. चतुर्थीत मखर किंवा माटोळी सजावट अशा स्पर्धा होऊ लागल्या आहेत. त्याच धर्तीवर दिवाळीलाही नरकासुर वध किंवा श्रीकृष्ण विजयोत्सव अशा नावांनी स्पर्धा आयोजित करण्यात येऊ लागल्या आहेत. यंदाही राज्याच्या विविध भागात अशा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून त्यावर 500 पासून एक लाख रुपयेपर्यंतची शेकडो बक्षिसे देण्यात येणार आहेत.
पावसामुळे विरस, सर्वांचाच मनोभंग
दरम्यान, रात्री उशीरां दहाच्या सुमारास राज्यात जवळजवळ सर्वच भागात जोरदार पाऊस कोसळल्यामुळे सर्वांचाच विरस झाला. कडाडणाऱया विजा आणि गडगडाटासह कोसळलेल्या पावसामुळे नरकासूर भिजून गेले. काहींच्या प्रतिमा दहनापूर्वीच गळून पडल्या. मोठमोठय़ा डिजेंच्या तालावर नाचणाऱया हौशी युवकांचा पुरता मनोभंग झाला. त्याचबरोबर विविध भागातील नरकासूर पाहण्यासाठी आपापल्या वाहनांमधून सहकुटुंब फिरण्यासाठी बाहेर पडण्याच्या तयारीत असलेल्यापैकी अनेकांनी आपले बेत रद्द करून घरीच राहणे पसंत केले. त्यामुळे बघ्यांची गर्दी बरीच कमी प्रमाणात दिसून आली.
मुख्यमंत्र्यांकडून दीपावलीच्या शुभेच्छा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीय जनतेला दीपावलीनिमित्त मंगलमय शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर ही दीपावली सर्वांच्या आयुष्यात शांती, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य व सुयश घेऊन येवो अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. दिवाळी हा सण अंधारावर प्रकाशाचे, वाईटावर चांगल्याचे, नैराश्यावर आशावादाचे आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे द्योतक आहे. हा सण वैश्विक बंधुभाव, एकता व समतेचा सोहळा आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.









