प्रतिनिधी/ पणजी
उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी राज्यात 144 कलमांतर्गत कर्फ्यू जाहीर केला असून 9 मे सकाळी 7 वाजल्यापासून 24 मे सकाळी 7 वाजेपर्यंत सदर कर्फ्यू सुरू राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
या काळात कामावर जाणाऱयांना बस सेवा चालू असेल पण फक्त 50 टक्के प्रवासी घेतले जातील. औषधालये, फार्मसी पूर्णवेळ चालू राहतील. किराणा दुकाने, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत चालू राहतील, बँक, विमा कंपन्यांची कार्यालये, एटीएम, इस्पितळे, जनावरांची इस्पितळे, प्रयोगशाळा, रक्तचाचणी केंद्र सुरू राहतील.
वृत्तपत्रे, बांधकामाची चालू असलेली कामे, शीतगृहे, फॅक्टरी उद्योगधंदे, दुरुस्ती कामे, कृषीसंबंधी कामे चालू राहणार आहेत. केंद्र तसेच राज्य सरकारची कार्यालये, पंचायत, पालिका, न्यायालये, रेल्वे, विमानतळ, स्वयंपाक गॅस पुरवठा, पेट्रोलपंप, इंटरनेट सेवासंबंधी गतीविधी, हॉटेल तसेच रेस्टॉरंटचे स्वयंपाकघर चालू राहणार आहे.
बार, कॅसिनो, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, ऑडिटोरियम, कॉम्युनिटी हॉल, रिव्हर क्रूझ, वॉटरपार्क, जीम, स्पा, सलून मसाजपार्लर, सिनेमा हॉल, थिएटर्स, स्वीमिंग पूल, शाळा, कॉलेज, टय़ुशन सेंटर, आठवडय़ाचे बाजार, पालिका बाजार, मासळी मार्केट बंद रहाणार आहे.
मंदिरे व धार्मिक स्थाने बंद असतील मात्र त्यातील नित्यपूजा चालू रहाणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित नको
गोव्यात प्रवेश करणाऱया प्रवाशांना निर्बंध घालण्यात आले असले तरी गोव्यातील नागरिकांना तसेच गोव्यात प्रवेश करण्यासाठी कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र लागणार नाही. याव्यतिरिक्त पर्यटक व इतरांना एक तर 72 तास ग्राहय़ असलेले कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र किंवा कोरोना लस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. पाचपेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र फिरता येणार नाही, असे 144 कलम लागू करणाऱया अधिसूचनेत म्हटले आहे.









