म्हार्दोळ येथे झाली बैठक
प्रतिनिधी / मडगाव
गोव्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाटय़ाने वाढू लागल्याने गोव्यातील दहा प्रमुख देवस्थाने 30 जून पर्यंत खुली न करण्याचा निर्णय काल रविवार दि. 7 रोजी म्हार्दोळ येथे महालसा देवस्थानात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सरकारने आज सोमवार दि. 8 जून पासून देवस्थाने खुली करण्यास मान्यता दिली होती. पण, संभाव्य धोका ओळखून हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
30 जून पर्यंत बंद ठेवण्यात येणारी 9 प्रमुख देवस्थाने पुढील प्रमाणे, श्री रामनाथ देवस्थान, रामनाथी-फोंडा, श्री नागेश महारूद्र देवस्थान, नागेशी-फोंडा, श्री मंगेश देवस्थान, मंगेशी-फोंडा, श्री महालसा नारायणी देवस्थान, म्हार्दोळ-फोंडा, श्री महालक्ष्मी देवस्थान, महालक्ष्मी-फोंडा, श्री. शांतादुर्गा देवस्थान, कवळे-फोंडा, श्री कामाक्षी देवस्थान, शिरोडा-फोंडा, श्री देवकृष्ण देवस्थान, मार्शेल-फोंडा व श्री दामोदर देवस्थान, जांबावली.
या वरील सर्व प्रमुख देवस्थानच्या समितीचे पदाधिकारी कालच्या बैठकीला उपस्थितीत होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आज सोमवारपासून मंदिरे पुन्हा खुली करण्यास मान्यता दिलेली आहे. पण, गोव्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाटय़ाने वाढू लागल्याने, तसेच फोंडा तालुक्यात आडपई, कुंकळय़े-म्हार्दोळ भागात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याने कालच्या बैठकीत सर्वांनीच चिंता व्यक्त करून अशा पार्श्वभूमीवर पुन्हा मंदिरे खुली करणे उचित ठरणार नसल्याचे मत व्यक्त करण्यात आले व मंदिरे 30 जून पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
मंदिरातील नेहमीची पूजा, नैवेद्य व आरत्या या केवळ पुरोहितामार्फत चालू ठेवल्या जाणार आहेत. इतर सर्व उत्सव हे स्थगित ठेवले जातील. केंद्रीय गृहमंत्रालयाने मंदिरे खुली करण्यास मान्यता दिल्याने, फोंडा तालुक्यातील अनेक मंदिरे पुन्हा खुली करण्याची तयारी सुरू केली होती. मंदिरांचे सॅनिटायझेशन करण्यात आले होते. मात्र, तालुक्यात दोन कोरोनाचे रूग्ण आढळून आल्याने मंदिरे खुली करण्याचा निर्णय रद्द करावा लागला.
वेर्णा महालसा देवस्थान अनिश्चित कालासाठी बंद
दरम्यान, जुने म्हार्दोळ येथील श्री महालसा नारायणी देवस्थान हे अनिश्चित कालासाठी बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. देवस्थान समितीचे सचिव सुहास वेर्णेकर यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे, मांगोर हिल-वास्को भागातून कोरोनाचे रूग्ण मोठय़ा संख्येने आढळून आल्याने तसेच हा भाग वेर्णाला जवळ असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. देवस्थानचे नित्याचे विधी हे पुजारी मार्फत चालू ठेवण्यात आले आहे.









