सांगली / प्रतिनिधी
राज्यभरातील रिक्षाचालकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राज्यातील सर्व रिक्षा संघटनांची दोन दिवसीय परिषद स्वाभिमानी रिक्षा मंच महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे 25 आणि 26 सप्टेंबर रोजी पनवेल, नवी मुंबई येथे होत असल्याची माहिती संयोजक महेश चौगुले आणि राजू रसाळ यांनी येथे दिली.
राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमधील संघटना श्री संत सावतामाळी सभागृह पनवेल नवी मुंबई येथे होणाऱ्या परिषदेत सहभागी होणार आहेत. सांगली जिल्ह्यातून त्यासाठी मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास चौगुले आणि रसाळ यांनी व्यक्त केला. ते सांगलीत आयोजित रिक्षाचालकांच्या बैठकीत बोलत होते.
ते म्हणाले, ऑटो रिक्षा चालकांसाठी शासनाने घोषणा केलेल्या मंडळाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी, ऑटो रिक्षा चालक प्रतिनिधीला विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळावे, रिक्षाचे खुले परमिट देणे तात्काळ बंद करावे, रिक्षांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन शहर, महानगर, जिल्हा, तालुका व गाव पातळीवर नव्याने सर्वे करून नवे ऑटो स्टँड निर्माण करण्यात यावेत, रिक्षाच्या कागदपत्रास 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, यासह विविध विषयांवर सकारात्मक चर्चा दोन दिवशीय परिषदेमध्ये होईल. त्याला सर्वांनी प्रतिसाद द्यावा.
यावेळी महेश चौगुले, राजू रसाळ यांच्यासह बाळू खतीब, तुषार मोहिते, आरिफ शेख, बंडू तोडकर, सलीम मलिद्वाले, मोसिन पठाण, अमीन मुल्ल्हा, सुहास कांबळे, बाबासाहेब चव्हाण आदी बैठकीस उपस्थित होते.