कोयना धरणात 100 टीएमसी पाणीसाठा, पावसाचा जोर पुन्हा वाढला
प्रतिनिधी/ नवारस्ता
गेल्या आठ दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने गेल्या चोवीस तासांपासून कोयना पाणलोट क्षेत्रात पुन्हा सुरवात केली असल्याने धरणात येणारी पाण्याची आवक ही वाढली. परिणामी कोयना धरणातील पाणीसाठय़ात वाढ होऊन शनिवारी सायंकाळपर्यंत धरणातील पाणीसाठय़ाने शंभरी गाठली. दरम्यान, धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरले जाण्याची शक्यता असल्याने राज्यातील वीज आणि सिंचनाचा प्रश्न सुटला आहे.
ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीपासूनच कोयना पाणलोट क्षेत्रात संततधार पावसाला सुरुवात झाल्याने अवघ्या काही दिवसांतच कोयना धरणाच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ होऊन धरणाच्या पाणीसाठय़ाने नव्वदी ओलांडली. मात्र संततधार पाऊस आणि धरणात येणारी पाण्याची मोठय़ा प्रमाणात आवक यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 14 ऑगष्ट पासून उघडण्यात आले होते. प्रथम पावणेदोन फूट, नंतर चार, सहा, सात आणि शेवटी दहा फुटांपर्यंत उघडून कोयना धरणातून सुमारे 56 हजार क्यूसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू होता. त्यामुळे पाटण, कराड आणि सांगली परिसरात पुराचा धोका ही निर्माण झाला होता.
दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पूर्णपणे ओसरल्याने कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे आणि पायथा विजगृह बंद आले होते. मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार गेल्या चोवीस तासांपासून पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने धरणाच्या जलपातळी पुन्हा वाढू लागली आहे. शनिवारी सायंकाळी उशिरा धरणातील पाणीसाठय़ाने शंभर टीएमसीचा टप्पा गाठला आहे.
दरम्यान 105 .25 टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणारे कोयना धरण या वर्षी ही पूर्ण क्षमतेने भरण्याची आशा पल्लवित झाल्या असल्याने कोयनेतून आता पूर्ण क्षमतेने 2000 मेगावॅट वीज निर्माण होऊन राज्यातील विजेचा आणि पूर्वेकडील सिंचनाचाही प्रश्न ही सुटला आहे.
शनिवारी सायंकाळपर्यंत कोयना 16(4113), नवजा 27(4710) आणि महाबळेश्वर 38(4583)इतक्या मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणाची पाणीपातळी 2159.02 फूट आणि 658.064 मीटर झाली असून धरणात प्रतिसेकंद 29 हजार 628 क्यूसेक पाण्याची आवक सुरु झाली आहे. परिणामी शनिवारी रात्री उशिरा धरणातील पाणीसाठय़ाने शंभरी गाठली.
चौकट: मंत्री देसाई यांच्या हस्ते होणार जलपूजन
कोयना धरणामध्ये 100 टीएमसी पाणीसाठा झाल्यानंतर प्रतिवर्षी धरणातील पाण्याचे जलपूजन आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम धरणस्थळवर संपन्न होतो. प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी ही पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते धरणाचे जलपूजन आणि ओटी भरण समारंभ लवकरच होण्याची शक्यता आहे.








