सरकारने अन्यायी जीआर रद्द करावा अन्यथा रस्त्यावर उतरू: माजी आमदार नितीन शिंदे
सांगली/प्रतिनिधी
राज्यातील 22 हजार महसूल कर्मचारी हे आपल्या न्याय मागण्यासाठी संपावर गेले आहेत. खरतर सभागृहात याच विषयावर चर्चा घडणे अपेक्षित असताना त्या ठिकाणी वेगळेच विषय चालू आहेत. वास्तविक त्यांच्या मागण्या रास्तच आहेत. त्यामुळे सरकारने हा अन्यायी जीआर रद्द करावा अन्यथा रस्त्यावर उतरू असा गर्भित इशारा माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिला आहे.
सांगलीत सुरू असलेल्या महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी जाऊन भाजपा नेते माजी आमदार नितीन शिंदे यांनी आंदोलनाला भारतीय जनता पार्टीच्यावतीने जाहीर पाठिंबा दिला. यावेळी शिंदे म्हणाले की, राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपावर तोडगा काढता आला नाही. त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, वीज वितरण कर्मचाऱ्यांचे आंदोलन, शेतकऱ्यांचे ऊसदराबाबतचे आंदोलन, पूरग्रस्तांच्या मदतीसाठीचे पूरग्रस्तांच्या आंदोलन यावर तोडगा काढून आंदोलन संपवणे बाबत सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन कर्मचाऱ्यांच्यावर अन्याय करणारा जीआर तातडीने रद्द करून आंदोलन संपवून सर्वसामान्यांचे हाल थांबावेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कैलास कोळेकर, सरचिटणीस सुधाकर जाधव, कमलेश डाळिंबे, कोषाध्यक्ष सुभाष कोंबासे, कार्याध्यक्ष जयंत निरगुडे ,सहसचिव सचिन सगर, उपाध्यक्ष सुनील चव्हाण, भाजपाचे प्रियानंद कांबळे, सुमित शिंगे यांच्यासह महसूल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








