राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची साताऱ्याला अचानक भेट
प्रतिनिधी / सातारा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच शाळा तब्बल अकरा महिने बंद होत्या. आता मात्र राज्याच्या शिक्षण विभागाच्या नव्याने घेतलेल्या धोरणानुसार राज्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा दि.27 पासून सुरु होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या वर्गांची घंटा खणाणणार आहे. आज अचानक राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी साताऱयाला भेट दिली. शिक्षण विभागाचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले.
सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिकच्या सर्वच माध्यमांच्या शाळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली अकरा महिने बंद होत्या. काही दिवसांपूर्वीच राज्य शासनाच्या निर्णयानुसार इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरु झाल्या. आता तर कोरोनाची लस आली आहे. राज्य शासनाने इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग दि.27 जानेवारीपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तयारी करण्याच्या सुचना शिक्षण विभागास दिलेल्या आहेत. आज त्याच अनुषंगाने अचानक राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सातारा जिल्ह्यात धावती भेट दिली.
सातारा जिल्ह्यात त्यांचे शिक्षण विभागाच्यावतीने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, हणुमंत खाडे यांच्यासह गटशिक्षणाधिकाऱयांनी केले. त्यांनी सातारा जिल्ह्यात राबवत असलेल्या उपक्रमाची माहिती घेतली. आढावा घेताना जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण विभागाकडून राबवत असलेल्या 36 उपक्रमामुळे लॉकडाऊनच्या काळातही ग्रामीण भागातील विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहिला नाही. त्यास शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील उपक्रमांचे आणि उपक्रमशिल शिक्षकांचे त्यांनी कौतुक केले. जिल्ह्यात दि.27 पासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करताना करावयची तयारी, विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देताना घ्यावयची काळजी याबाबत त्यांनी काही सुचनाही केल्या.
तब्बल अकरा महिन्यानंतर इयत्ता पाचवी ते आठवी या वर्गाची घंटा खणाणणार असुन शाळेत विद्यार्थ्यांना पाठवण्यासाठी पालकांच्या मनात अजूनही धास्ती असली तरीही काळजी घेतली जाणार असल्याने शिक्षण विभागाकडून शासनाकडून दिलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार शाळा भरवली जाणार आहे, असे शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले.