माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांची खंत : बेंगळुरात निजद मेळावा
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्याभरात निजदची ताकद आहे. पण पक्षातील नेत्यांमध्ये एकतेचा अभाव आहे, अशी खंत निजद राष्ट्रीय अध्यक्ष व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी व्यक्त केली. बेंगळुरातील राजवाडा मैदानावर रविवारी आयोजित निजद पक्षाचा मेळावा आणि नूतन ग्राम पंचायत अध्यक्ष-उपाध्यक्ष व सदस्यांच्या सत्कार समारंभाचे उद्घाटन करून ते बोलत होते.
देवेगौडा पुढे म्हणाले, जर आपण एकीने लढलो तर पक्ष मजबूत होईल. आगामी तालुका, जिल्हा पंचायत निवडणुकीच्या तिकीट वाटपानंतर गोंधळ निर्माण झाल्यास कोणीही पक्षविरोधी काम करू नये. सर्वांनी एकत्रित येऊन पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन त्याच्या विजयासाठी प्रयत्न करावे. तसेच पक्षातील एकतेचे दर्शन घडवावे, असे त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीदरम्यान काही नेत्यांनी निजद पक्ष टिकणार नाही, असे वक्तव्य केले होते. पण, पक्ष कमकुवत झाला नसून ग्राम पंचायत निवडणुकीत पक्षाने आपली ताकद सिद्ध करून दाखविली आहे. पक्षाशी निष्ठावंत असलेले नेते निजदमध्ये आहेत. जिल्हा व तालुका पंचायत निवडणुकीत निजदला पहिला क्रमांक मिळाला पाहिजे. लवकरच पक्षाच्या तालुका आणि जिल्हा घटकांची पुनर्रचना करण्यात येईल, असेही देवेगौडा म्हणाले.
आगामी पोटनिवडणुका निजद लढविणार
आगामी पोटनिवडणुकीत निजदतर्फे उमेदवार उतरविण्यात येणार आहेत. कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर बसवकल्याण, मस्की आणि सिंधनूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढविली जाईल, असे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सांगितले. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांची अनुमती असल्याचे गृहित धरून ही घोषणा करत आहे. निवडणुकांसाठी पैसा नसल्याने पोटनिवडणूक लढविणार नाही, असे देवेगौडा यांनी सांगितले होते. पैसे नसताना कर्ज काढून पक्षाला बळकट केले आहे. त्यामुळे पक्षाला उंचीवर घेऊन जाण्यासाठी आणखी कठोर मेहनत घेतली जाईल, असेही कुमारस्वामी म्हणाले.









