विद्यार्थ्यांमधील गोंधळ शिक्षणमंत्र्यांनी केला दूर
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसईच्या दहावी परीक्षा रद्द तर बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. त्यामुळे राज्यातील दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला असून याबाबत राज्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
सीबीएसईप्रमाणे राज्यातील दहावी परीक्षा रद्द करण्याचा आणि बारावी परीक्षा लांबणीवर टाकण्याचा कोणताही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही, असे सुरेशकुमार यांनी सांगितले आहे. कोरोना परिस्थितीमुळे केंद्र सरकारने सीबीएसईच्या दहावी, बारावी परीक्षेसंदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे राज्याचा अभ्यासक्रम शिकणाऱया दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबाबत गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा किंवा लांबणीवर टाकण्याचा सध्या कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे स्पष्टीकरण ट्विटरवर दिले आहे.
पुढील परिस्थिती बघून निर्णय राज्यात 21 जूनपासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. सध्या एप्रिल महिना आहे. त्यामुळे पुढील परिस्थिती बघून परीक्षेसंदर्भात निर्णय घेण्यात येईल. इतक्यात निर्णय घेण्याची वेळ आलेली नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय उत्तीर्ण करण्याचा विचार सरकारपुढे नाही, असेही त्यांनी सांगितले.









