अजितदादांनी लॉकडाऊनची वर्तवली शक्यता
प्रतिनिधी/ सातारा
केंद्र व राज्य सरकार कोरोना, ओमायक्रानच्या अनुषंगाने प्रयत्न करत आहे. प्रत्येक जिह्याचे पालकमंत्री सगळय़ांना विश्वासात घेवून कामे करत आहेत. आम्ही त्यांच्याकरता डीपीसीमधून राज्यासाठी चार हजार कोटींचा अतिरिक्त निधी ठेवलेला आहे. ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे सरकारच्यावतीने काही काळजी करण्याचे कारण नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगताच पत्रकारांनी कोरोनाची वाढत असलेली आकडेवारीची भिती दाखवताच आपल्याकडे असेच आकडे वाढले तर पश्चिम बंगालसारखे लॉकडाऊन करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सांगितले. दरम्यान, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका नाहीत, असेही त्यांनी सुचक वक्तव्य केले.
साताऱयात विविध उद्घाटनांच्या कार्यक्रमानंतर राष्ट्रवादी भवनात पत्रकारांशी ते बोलत होते. पत्रकारांनी सुरुवातीलाच कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीचा प्रश्न छेडला. त्यावरुन ते म्हणाले, अशीच आकडेवारी वाढत राहिली तर पश्चिम बंगालसारखी आपल्याही राज्यात रात्रीचा लॉकडाऊन करावा लागेल. कारण जेवण करताना एकत्र येतात. मास्क काढला जातो अन् प्रार्दुभाव वाढतो, असे त्यांनी सांगत पुढे ते म्हणाले, ओमायक्रोंनचा नवीन विषाणूचे रुग्ण पहायला मिळाले आहेत. माझे एकच मत आहे की सरकार कोणाचही असल तरी पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री उद्धवसाहेब प्रयत्न करताहेत. आमचे पालकमंत्री सगळय़ांना विश्वासात घेवून प्रयत्न करताहेत. आम्ही कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी डीपीसीमधून निधी देतो आहे. मी डिपीसीला साडेअकरा हजार कोटी दिले. त्याच्या 30 टक्के म्हणजे जवळपास साडे तीन ते पावणे चार हजार कोटी संपूर्ण राज्यात या कामाकरता कोरोना आटोक्यात येण्याकरता दिलेले आहेत. पुढे ते म्हणाले, व्हॅक्सिन सगळय़ांनी घेतली पाहिजे. लवकरच दीडशे कोटी लसीकरण झाल्यार्यंत आपण पोहचू. राज्याची लोकसंख्या 125 कोटी धरली तर अडीचशे कोटीपर्यंत आपण पोहचायला पाहिजे. सगळय़ाच जिह्यात दोन व्हॅक्सीन कसे मिळेल यासाठी सरकारचा प्रयत्न सुरु आहे. आजपासून आमच्या मुलांना मुलींना व्हॅक्सिन सुरु केलेले आहे, असे त्यांनी भाष्य केले.
विरोधकांवर टीप्पणी
पुढे पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना अजितदादा म्हणाले, सुधीर मुनगंठीवारांनी काय बोलावे हा त्यांचा अधिकार आहे. तुम्ही त्यांची वक्तव्य ऐकली तर एवढी उदाहरण देत बसतात की मुद्याचे थोड असते बाकीचे जास्त असते, अशा शब्दात त्यांच्यावर टीप्पणी करत पुढे ते म्हणाले, आम्ही जाहीरनामा दिलेला होता काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्रीत मिळून आले असते तरचा तो दिला होता. नंतरच्या काळात राजकीय समिकरण इतकी बदलली की काँग्रेस राष्ट्रवादीचे बहुमत होवू शकत नव्हत. दोघांचे मिळून 98 पर्यंत पोहचू शकत होतो. फारतर पाच दहा मित्रपक्ष धरले तर 110 पर्यंत पोहचू शकलो असतो. 35 ची मॅजिक फिगर कमी पडत होती. आमचे वरीष्ठ पवारसाहेब, काँग्रेसचे वरीष्ठ सोनिया गांधी, आणि शिवसेनेचे वरीष्ठ उद्धव ठाकरे हे एकत्र बसले. शिवसेनेची राजकीय विचारधारा वेगळी आहे. बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी कॉमन मिनिमम प्रोगॅम ठरवला.
निवडणूकीत हार जित होत असते
राणेंच्या विजयाबाबत छेडले असता अजितदादा म्हणाले, त्यांचा विजय झाला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. निवडणूकीमध्ये यश अपयश हे चालत असते. तिथे महाविकास आघाडी कमी पडली. थोडस बॅकफुटवर जाव लागले. पण बाकीच्या ठिकाणी आम्हाला यश आलेला आहे.