राज्याचे प्राथमिक-माध्यमिक शिक्षणमंत्री सुरेश कुमार यांची माहिती : खानापूर क्षेत्रशिक्षणाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद
प्रतिनिधी / खानापूर
कर्नाटक राज्यातील 50 वर्षांहून अधिक जुन्या प्राथमिक शाळा इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी बहुसंख्य इमारती आता कमकुवत झाल्या आहेत. यामुळे त्या ठिकाणी जुन्या इमारती काढून नवीन शाळा इमारत बांधण्याची योजना आखण्यात आली असून येत्या अर्थसंकल्पात यासाठी विशेष अनुदान मंजूर करून घेतले जाणार असल्याची माहिती राज्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांनी खानापूर येथील क्षेत्रशिक्षणाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
ते म्हणाले, कोविडमुळे यावर्षी शाळा सुरू होतील की नाही, अशी शंका होती. पण आता सहावीपासून दहावीपर्यंतच्या माध्यमिक शाळा तसेच पदवीपूर्व व पदवी महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. तर आता केंद्र सरकारने मंजुरी दिल्यास लवकरच पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्गही सुरू करण्याची तयारी शिक्षण खात्याने ठेवली आहे.
प्राथमिक व माध्यमिक शाळेत मुलांना गुणात्मक शिक्षण मिळावे, यासाठी राज्य शासनाने विविध शैक्षणिक उपक्रम सुरू केले आहेत. तसेच एखाद्या विद्यार्थी कोणत्या विषयात कमी आहे. याची पाहणी करून त्या विद्यार्थ्याला संबंधित विषयात कसा पारंगत होईल, यासाठी देखील लक्ष घालण्याची सूचना शिक्षण विभागातर्फे शिक्षकांना केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
ग्रामीण भागातील शाळांकडे शहरातील शिक्षकांना पाठविणार
तालुक्याच्या सीमाभागातील शाळांमध्ये शिक्षकांची संख्या अपुरी आहे. पण शहरी भागातील शाळांमध्ये शिक्षकांची संख्या अधिक आहे. अशा शिक्षकांना ग्रामीण भागातील शाळांकडे पाठविण्यासाठी शिक्षण विभाग लवकरच निर्णय घेणार आहे.
दुर्गम भागातील गावातील मुलांना नजीकच्या शाळेला येण्यासाठी बसची व्यवस्था नाही. यामुळे अडचणांच्या मार्गातून पायपीट करत विद्यार्थ्यांना शाळेला यावे लागत आहे. याकडे पत्रकारांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, यासाठी परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांना पत्र लिहून अशा ठिकाणी बसची व्यवस्था त्वरित करावी, अशी विनंती करण्यात आली. शाळेला येण्यासाठी मुलांना कोणताही त्रास होणार नाही, याची शासनाकडून विशेष दक्षता घेतली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच अनेक फिरत्या कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित राहतात, अशा मुलांच्या बाबतीत राज्य शासनाने विशेष गांभीर्य राखले असून राज्यातील एकही मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये, यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
तालुक्यातील शाळा-खोल्यांच्या बांधकामासाठी अनुदान मंजूर करा
खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्यावतीने शिक्षणमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
नंदगड : गोवा-महाराष्ट्र सीमेवर असलेल्या तसेच दुर्गम डोंगराळ भागात असलेल्या खानापूर तालुक्यातील जनतेची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. सरकारी शाळा या भागातील जनतेचा एक आधारस्तंभ आहेत. त्यासाठी तालुक्मयाच्या ग्रामीण भागातील शाळा-खोल्यांसाठी अनुदान मंजूर करावे, या बाबतचे निवेदन शिक्षणमंत्री सुरेश कुमार यांना खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस कमिटीच्यावतीने देण्यात
आले.
खानापूर तालुक्मयात अती पाऊस पडत असल्याने दरवषी अनेक शाळा खोल्या नादुरुस्त होऊन त्या जमीनदोस्त होतात. गेल्या कित्येक वर्षांपासून सातत्याने होणारी ही समस्या आहे. एकूण 99 शाळांच्या 197 खोल्या मंजूर करून, त्यासाठी त्वरित अनुदान मंजूर करावे व लवकरात लवकर शाळा खोल्या बांधकामाची कामे सुरू करावित, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देताना ब्लाँक काँग्रेसचे अध्यक्ष मधूकर कवळेकर, महादेव कोळी, महिला अध्यक्षा अनिता दंडगल, संदीप देसाई, गुड्डूसाब टेकडी, वैष्णवी पाटील, अदृश्य दुंडपन्नावर, इसाक पठाण, अभिषेक शहापूरकर, रामचंद्र पाटील, इसाक तिगडी, पूजा गुरव, गंगुबाई मादार, सखुबाई पाटील आदींसह अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.









