प्रतिनिधी / दापोली
गेले कित्येक वर्ष रखडलेल्या राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे अशा स्वरूपाचे आदेश शासनाकडून मंगळवारी सकाळी जारी करण्यात आले आहे.
राज्यातील चार कृषी विद्यापीठातील प्राध्यापक वर्गाला मात्र हा निर्णय अद्याप लागू करण्यात आलेला नाही. पुढील काही दिवसात याबाबत सकारात्मक निर्णय लागू होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील प्राध्यापक कर्मचारी वगळून जवळपास दीड हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. कृषी विद्यापीठ संलग्न कृषी महाविद्यालय संलग्न कृषी विद्यालये व ग्रामीण शिक्षण संस्था वर्धा, अमरावती येथील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबतचे आदेश महाराष्ट्र शासनाचा कृषी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य विभाग यांनी मंगळवारी जारी केला आहे. याबाबतचा लेखी आदेश महाराष्ट्र शासनाचे उपसचिव सु. स. धपाटे यांनी मंगळवारी सकाळी जारी केला आहे.