डॉ. केतन भाटीकर यांचा आरोप : एकाच प्रकरणात दोनवेळा नोटीसा
प्रतिनिधी/ फोंडा
मडगावात भर दिवसा सोनाराचा खून होतो, शिरोडय़ात एकाच रात्री आठ दुकाने फोडली जातात. राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळलेली असताना सरकार एका छोटय़ाशा प्रकरणात आपल्याला अडकवण्यासाठी तब्बल दोन वेळा कारणे दाखवा नोटीस पाठविते. प्रशासनाची ही कार्यक्षमता म्हणायची की, विरोधाभास ? असा प्रश्न फोंडय़ातील मगोचे नेते डॉ. केतन भाटीकर यांनी उपस्थित केला आहे.
फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. भाटीकर बोलत होते. यावेळी सुशांत कवळेकर व विराज सप्रे हे उपस्थित होते. ढवळी येथील आपले जुने घर पाडून त्याठिकाणी नवीन घर बांधण्यासाठी भूखंड तयार करण्याच्या प्रक्रियेला बेकायदेशीर डोंगर कापणीचे स्वरुप देऊन आपल्या विरुद्ध एफआयआर दाखल केलेला आहे. त्याची चौकशी होऊन प्रकरण सध्या न्याय प्रविष्ठ असताना मडगाव येथील दक्षिण गोवा उपजिल्हाधिकारी कार्यालयातर्फे पुन्हा एकदा त्याच प्रकरणात कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. या प्रकरणी फोंडा उपजिल्हाधिकाऱयांनी यापूर्वीच नोटीस जारी केलेली असताना त्याच प्रकरणात पुन्हा कारणे दाखवा नोटीस पाठविणे हा हास्यास्पद प्रकार आहे, असे डॉ. भाटीकर म्हणाले.
विलास देसाईविरुद्ध कारवाई का होत नाही ?
भाजपाचे सावर्डेतील गटप्रमुख विलास देसाई यांच्याविरुद्ध पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी आर्थिक व्यवहार केल्याचा गंभीर प्रकार आपण उघडकीस आणलेला आहे. या प्रकरणी कुणीच चौकशी करीत नाही. शिवाय भाजपाचा एकही नेता त्या विरोधात बोलत नाही. मात्र एका क्षुल्लक प्रकरणात आपल्याला गुंतवण्यासाठी सरकारी यंत्रणा किती झटपट काम करते हे या कारणे दाखवा नोटीसीवरून स्पष्ट होत असल्याचे डॉ. भाटीकर यांनी सांगितले. राज्यातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, तसेच वाढत्या गुन्हय़ांना आळा घालण्यासाठी हीच यंत्रणा एवढय़ा कार्यक्षमपणे काम करताना दिसत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
सिरसाट यांचा मगो प्रवेश
दरम्यान, फोंडा येथील युवा काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष वसंत सिरसाट यांनी नुकताच मगो पक्षात प्रवेश केला. त्यांना डॉ. भाटीकर यांनी पक्षात रितसर प्रवेश दिला. येत्या 20 सप्टें.नंतर साधारण 50 कार्यकर्ते मगोत प्रवेश करणार असल्याचे सिरसाट यांनी यावेळी बोलताना सांगितले.









