साहाय्यधनात वाढ : महिला कामगारांना मिळणार प्रसूती भत्ता : कामगारमंत्री शिवराम हेब्बार यांची माहिती
प्रतिनिधी /बेंगळूर
कामगार कल्याण मंडळामार्फत दिल्या जाणाऱया साहाय्यधनात मोठी वाढ करण्यात आली असून महिला कामगारांसाठी प्रथमच प्रसूती भत्ता देण्याची घोषणा करण्यात आली आहे. कामगारांना आपल्या मुलांसाठी शैक्षणिक प्रोत्साहनधन मिळविण्यासाठी असणारी वेतनमर्यादा 15 हजार रुपयांवरून 21 हजार रुपये इतकी निर्धारित करण्यात आली आहे, अशी माहिती कामगारमंत्री शिवराम हेब्बार यांनी दिली आहे.
नेंदणीकृत कामगारांना देण्यात येणाऱया वैद्यकीय मदतीची रक्कम 10 हजारवरून 25 हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. कामगार अपघात मदतीची रक्कम 3 हजार रु. वरून 10 हजार रु. पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहितीही मंत्री शिवराम हेब्बार यांनी कामगार खात्यातील अधिकाऱयांच्या बैठकीनंतर दिली आहे.
कामगारांच्या साहाय्यधनामध्ये मोठी वाढ करण्यात आली असून अधिकाधिक कामगारांना याचा लाभ व्हावा, यासाठी प्रयत्न करण्याची सूचना अधिकाऱयांना देण्यात आली आहे. कामगार कल्याण मंडळाकडून लागू करण्यात आलेल्या या योजना असंघटीत कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना उपलब्ध आहेत. साहाय्यधनाची रक्कम वाढविण्यात आल्यामुळे कामगारांना अधिक अनुकूल होणार आहे, असे ते म्हणाले.
अधिक कर्मचाऱयांना मिळणार लाभ
शैक्षणिक प्रोत्साहनधन योजनेंतर्गत कामगार खात्याने आठवी ते दहावीपर्यंतच्या मुलांना, डिप्लोमा, आयटीआय कोर्स, पदवी, पदव्युत्तर पदवी, इंजिनियरिंग आणि वैद्यकीय कोर्ससाठी एका कुटुंबातील एका विद्यार्थ्याला साहाय्यधन देण्यासाठी असणारी वेतनमर्यादा (दरमहा) वाढविली आहे. त्यामुळे अनेक कामगारांच्या मुलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मृत कामगाराच्या अंत्यविधीसाठी दिली जाणारी रक्कम 5 हजारावरून 10 हजार रु. इतकी करण्यात आली आहे.
दरवर्षी कामगारांचे आयोग्य तपासणी शिबिर आयोजिणाऱया ट्रेड युनियन किंवा संस्थांना देण्यात येणाऱया साहाय्यधनातही 1 लाख रु. पर्यंत वाढ करण्यात आली आहे. याआधी त्यांना 30 हजार रु. साहाय्यधन दिले जात होते. संघटीत क्षेत्रातील महिला कामगारांना पहिल्या दोन अपत्यांसाठी प्रत्येकी 10 हजार रुपये प्रसूती भत्ता देण्याची नवी योजनाही जारी करण्यात आली आहे.









