राज्य सरकारचा टाटा टेक्नॉलॉजिस लि. शी करार : रोजगाराच्या संधी वाढविण्यास होणार मदत
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा (आयटीआय) दर्जा सुधारण्यासाठी आणि राज्यातील युवकांना रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी पुणे येथील टाटा टेक्नॉलॉजिस लि. कंपनीशी महत्त्वपूर्ण करार केला आहे. मुख्यमंत्र्यांचे बेंगळूरमधील शासकीय कार्यालय ‘कृष्णा’ येथे येडियुराप्पा यांच्या उपस्थितीत हा करार झाला आहे. टाटा टेक्नॉलॉजिसचे आनंद भडे आणि कौशल्यविकास खात्याचे सचिव डॉ. एस. सेल्वकुमार यांनी करारावर स्वाक्षऱया केल्या.
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री येडियुराप्पा म्हणाले, देशात प्रथमच कर्नाटक सरकार आणि उद्योजकांनी हातमिळवणी करून असा नूतन प्रयोग हाती घेतला आहे. या प्रयत्नांमुळे राज्यातील युवकांना उत्कृष्ट आणि मागणीनुसार कौशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध होईल. तसेच रोजगारासाठी कौशल्यप्राप्त मनुष्यबळ उपलब्ध होईल. शिवाय राज्यात उद्योजकांना गुंतवणुकीसाठी पूरक वातावरणनिर्मिती होईल, असा विश्वास व्यक्त केला.
1 लाखहून अधिक युवकांना रोजगार
उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण म्हणाले, टाटा टेक्नॉलॉजिस लि. कंपनीशी करार केल्यामुळे दरवर्षी किमान 1 लाखहून अधिक युवकांना रोजगार मिळेल. शिवाय उद्योगांच्या मागण्यांच्या आधारे 10 कोर्स देखील सुरू केले जाणार आहेत. आगामी दिवसांत आयटीआय महाविद्यालयांमध्ये आवश्यक कौशल्यविकास प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
स्वयंरोजगारालाही मिळणार प्रोत्साहन
याप्रसंगी टाटा टेक्नॉलॉजिस लि. चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ वॉरन हॅरिस म्हणाले, औद्योगिक क्षेत्रात होणाऱया जलद बदलांनुसार अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी हा करार उपयुक्त ठरणार आहे. अत्याधुनिक यंत्रोपकरणे, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, व इतर कोर्सेसना प्राधान्य देण्यात येईल. औद्योगिक विकासाबरोबरच स्वयंरोजगारालाही यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे.
150 आयटीआयचा दर्जा सुधारणार
राज्य सरकारने टाटा कंपनीशी करार केल्यामुळे विद्युतचलित वाहने, कृषी यंत्रोपकरणे, एरोस्पेस आणि संरक्षणविषयक उपकरणे, बागायत आणि स्मार्टसिटी व इतर क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण देण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. राज्यातील 150 आयटीआयचा दर्जा सुधारण्यात येणार आहे. तसेच टाटा कंपनी व त्यांच्याशी संलग्न राहून कार्यरत असणाऱया कंपन्यांमधील निष्णात कर्मचारी आयटीआयमध्ये प्रशिक्षण देणार आहेत. पहिल्या टप्प्यात पिन्य, होसूर रोड, बळ्ळारी, म्हैसूर, दास्तिकोप्प आणि शिकारीपूर सरकारी आयटीआयचा दर्जा सुधारण्यात येणार आहे.









