बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. राज्यात सध्या ५० हजाराहून अधिक रुग्ण उपचारात आहेत. राज्यात कोरोनाला आळा घालण्यासाठी सर्व उपाययोजना राबविल्या जात आहेत. दरम्यान सरकारने बेंगळूरसह आठ शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. १० ते २० एप्रिल दरम्यान रात्री १० ते सकाळी ५ या वेळेत नाईट कर्फ्यू लागू केला जाणार आहे. ज्या शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे त्यात बेंगळूर, मंगळूर, म्हैसूर, गुलबर्गा, बिदर, तुमकूर, उडुपी आणि मणिपाल यांचा समावेश आहे. तथापि, या काळात आवश्यक सेवांसाठी सूट देण्यात येणार आहे.
कर्नाटकात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. गुरुवारी राज्यात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या ५० हजारांच्या पुढे गेली. गुरुवारी नवीन प्रकरणांची संख्या ६,५७० वर पोहोचली. राज्यात गेल्या चोवीस तासात ३६ संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार गुरुवारी २,३९३ रुग्ण निरोगी झाल्यानंतर घरी परत आले आहेत.