मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची घोषणा : लवकरच अधिकृत आदेश : कोरोना संक्रमणामुळे निर्णय
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर कर्नाटकातही दिवाळी कालावधीत फटाके विक्री आणि फटाके उडविणाऱयावर बंदी घालण्यात येणार आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी ही माहिती दिली असून लवकरच यासंबंधी अधिकृत आदेश जारी करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे दिल्लीसह इतर राज्यांप्रमाणेच कर्नाटकातही यंदा दिवाळी फटाक्यांविना साजरी होणार आहे. दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱयांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी कोरोनामुळे संक्रमित झालेल्या रुग्णांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आरोग्य विभागाच्या तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. बेंगळूरमधील गृहकार्यालय कृष्णा येथे राज्यातील आयटीआय महाविद्यालयांच्या उन्नतीकरणासंबंधी करार झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी राज्यात फटाक्यांवर बंदी घालण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे देशातील ओडिशा, राजस्थान आणि दिल्ली या राज्यांच्या यादीत कर्नाटकाचाही समावेश झाला आहे.
गुरुवारी आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी राज्यातील कोरोना तज्ञ समिती आणि तांत्रिक सल्लागार समितीची बैठक घेतली होती. या बैठकीत दिवाळी कालावधीत फटाक्यांवर बंदी घालण्याचा सल्ला देण्यात आला होता. फटाक्यांमुळे वायूप्रदूषण होऊन कोरोना संक्रमितांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे राज्य सरकारने फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी यंदा दिवाळीत फटाक्यांची विक्री किंवा फटाके फोडण्यावर निर्बंध येणार आहेत.
फटाक्यांशिवाय दिवाळीची कल्पनाच करता येत नाही. दिवाळी आणि फटाके हे समीकरणच बनले आहे. तथापि, कोरोना संक्रमणाचा विचार करून यंदा दिवाळी कालावधीत फटाक्यांवर बंदी घालण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयाबद्दल फटाकेप्रेमींमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. याबाबत राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे.
लवकरच लव्ह जिहादविरोधी कायदा
राज्यात विवाहाच्या निमित्ताने फसवणूक करून युवतींचे धर्मांतर केले जाते. यावर रोख लावण्यासाठी लवकरच कायदा जारी करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. केवळ विवाहासाठी केल्या जाणाऱया धर्मांतरावर बंदी घालणारा कायदा तयार करण्यासाठी कायदेतज्ञांशी चर्चा करण्यात येईल. त्यानंतर लगेच कायदा जारी करण्यात येईल, असे येडियुराप्पा यांनी सांगितले.
नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर करडी नजर
दिवाळीत नियमांचे उल्लंघन करून छुप्या पद्धतीने फटाके उडविणाऱयांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दिवाळी कालावधीत फटाक्यांवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे यंदा कोणीही फटाके न फोडता दिवाळी साजरी करावी, असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी केले आहे. कोरोना परिस्थितीमुळे राज्यातील जनतेच्या आरोग्यहितासाठी फटाक्यांवर बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. फटाके फोडण्यावर निर्बंध घालण्यासाठी नियम तयार करण्यात येतील. शनिवारपर्यंत नियमांसंबंधी रुपरेषा अंतिम करण्यात येईल, असे डॉ. सुधाकर यांनी सांगितले.
हिरवे फटाके वापरण्याचे आवाहन
फटाकेबंदीच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी शुक्रवारी रात्री पत्रक प्रसिद्ध करून राज्यातील जनतेला साधेपणाने आणि अर्थपूर्णपणे दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. शिवाय केवळ हिरव्या फटाक्यांचा (ग्रीन क्रॅकर्स) वापर करता येईल, असे सांगितले आहे. पारंपरिक फटाक्यांच्या तुलनेत हिरव्या फटाक्यांचा आकार लहान असतो. ते कमी हानीकारक कच्चा माल वापरून तयार केले जातात. त्यामुळे अत्यंत कमी प्रमाणात प्रदूषण होते. लिथियम, आर्सेनिक, बेरियम आणि शिसे यासारख्या घातक रसायनांचा वापर हिरव्या फटाक्यांमध्ये केला जात नाही.









