प्रतिनिधी / सातारा :
सातारा जिल्ह्याचे सुपुत्र तथा बुध, ता. खटाव येथील वैभव राजेघाडगे यांची राज्याच्या वित्त विभागाच्या अखत्यारीत संचालक, लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य पदी पदोन्नती झाली असून त्यांनी नुकताच संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. प्रचंड सकारात्मक ऊर्जा, पारदर्शी कारभार व कर्तव्य निष्ठ म्हणून महाराष्ट्रभर त्यांची प्रतिमा आहे.
2004 ते 2008 या काळात त्यांनी सातारा जिल्हा कोषागार अधिकारी म्हणून काम करताना जिल्हा कोषागाराची सुसज्ज इमारत उभी केली. तसेच जिल्हा कोषागारात ट्रेझरी नेटचा पायलट प्रोजेक्ट राबविला. त्याची राज्यभर यशस्वीपणे अंमलबजावणी सुरू आहे. त्याचबरोबर राजीव गांधी गतिमानता अभियानात सातारा कोषागाराला विभागीय पातळीवरील पुरस्कार मिळवून जिल्ह्याचे नाव राज्यात केले.
वैभव राजेघाडगे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये प्रथम महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा वर्ग 1 म्हणून नोकरीस सुरवात केली.
यानंतर सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य वित्त व लेखा अधिकारीपदी पदोन्नती झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मालकीची डबघाईला आलेली प्रिंटिंग प्रेसला उर्जितावस्थेला आणली व जिल्हा परिषदेच्या निधीत वाढ करण्यासाठी भरीव योगदान दिले. सध्या मुंबई येथील अधिदान व लेखाअधिकारी म्हणून काम करताना ई कुबेर प्रणाली नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे. सुमारे 70 हजार निवृत्ती वेतनधारकांना दरमहा नियमित निवृत्तीवेतन व दर्जेदार सुविधा निर्माण करण्यासाठी राजेघाडगे यांचा पुढाकार होता. त्यांच्या या कार्याची दखल राज्य शासनाने घेऊन त्यांना राज्याच्या लेखा व कोषागार विभागाच्या संचालकपदी वर्णी लावुन कार्यतत्पर व कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्वाचा बहुमान केला.









