मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची माहिती : बेंगळूरमध्ये 67 व्या सहकार सप्ताहाचे उद्घाटन, सहकार रत्न पुरस्काराचे वितरण
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोनामुळे खालावलेली आर्थिक परिस्थिती संथगतीने सुधारत आहे, असे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी सांगितले आहे. कर्नाटक राज्य सहकार महामंडळ, कर्नाटक राज्य ग्राहक सहकार महामंडळ, कर्नाटक दूध महामंडळ, कर्नाटक सहकार तेलबिया उत्पादक महामंडळ आणि सहकार खात्याच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी विधानसौध येथे आयोजित 67 वा अखिल भारत सहकार सप्ताहाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
कोरोनामुळे भारतासह संपूर्ण जगाची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. आता हळूहळू आर्थिक स्थिती सुधारत आहे. लॉकडाऊन कालावधीत सहकार खाते आणि सहकारी संस्थांनी गरीबांसाठी, स्थलांतरित मजुरांसाठी आर्थिक मदत, धान्यांसह जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला आहे. ही बाब प्रसंशनीय आहे, असे ते म्हणाले.
लॉकडाऊन कालावधीत सहकार खात्यामार्फत 39,600 कोटी रुपयांचा आर्थिक स्पंदन कार्यक्रम आयोजित करून विविध क्षेत्रातील गरजुंना कर्ज वितरण करण्यात आले आहे. आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत केंद्र सरकारने अलिकडेच सहकार क्षेत्रातील पायाभूत सुविधांची योजना घोषित केली आहे. शेतकरी उत्पादक संस्था आणि प्राथमिक कृषी पतसंस्थांचे सशक्तीकरण करण्यासाठी कर्नाटकाला 4,525 कोटी रुपये देण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या या अनुदानातून ग्रामीण भागात गोदामे, शेतीमाल थेट शेतातून खरेदीसाठी संपर्कव्यवस्था, कृषी पतसंस्था बहुद्देशीय सेवांसाठी वापरण्यात येणार आहे, असे येडियुराप्पा म्हणाले.
सहकारी संस्थांमार्फत शेतकऱयांनाही कर्जवितरण केले जात आहे. 2020-21 या वर्षात 15 लाखहून अधिक शेतकऱयांनी 9,502 कोटी रुपये कर्ज घेतले आहे. त्यांच्या कर्जावरील व्याजाच्या सबसिडीपोटी सरकारने 496.24 कोटी रुपये अनुदान मंजूर केले आहेत. केंद्र सरकारने देखील कोरोनासंकट काळात ‘स्पेशल लिक्विडीटी फेसिलिटी’ अंतर्गत 1700 कोटी रुपये नाबार्डमार्फत डीसीसी बँकांना दिले आहेत. यातून शेतकऱयांना कर्जे देण्यात आली आहेत, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमप्रसंगी सहकार क्षेत्रात असाधारण कामगिरी केलेल्यांना सहकार रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण, लक्ष्मण सवदी, सहकारमंत्री एस. टी. सोमशेखर, महसूलमंत्री आर. अशोक, नगरविकासमंत्री बी. ए. बसवराजू आदी उपस्थित होते.









