सर्व आस्थापने दिवसभर खुली : राज्याचे जनजीवन पूर्वपदावर बहुतांश अर्थिक व्यवहार सुरु
प्रतिनिधी /पणजी
कोरोनामुळे राज्यातील बिघडलेल्या परिस्थितीतून मार्ग काढून गोव्याची गाडी अखेर पूर्वपदावर आली आहे. सोमवारपासून सरकारने सायंकाळी 6 वा. पर्यंत सर्व आस्थापने खुली ठेवण्यास परवानगी दिली आणि गोव्याचे सारे व्यवहार पूर्वपदावर आले. जनजीवन सुरळीत झाले. मात्र महामारीच्या नियमांचे पालन करुन स्वतः काळजी घेणे अजूनही आवश्यक आहे. गेल्या 24 तासात कोविडमुळे केवळ 2 जण दगावले आणि नव्याने 130 जण बाधित ठरल्याने परिस्थिती आता पूर्णतः नियंत्रणात आली आहे.
राज्यातील हॉटेलांसह बार ऍण्ड रेस्टॉरंटसही सोमवारी सुरू झाले. बहुतांश दुकाने तथा व्यापारी आस्थापने सायंकाळी 6 वा. पर्यंत खुली झाली तसेच देश विदेशातून पर्यटक मर्यादित असले तरी येऊ लागले आहेत.
बहुतांश आर्थिक व्यवहार पुन्हा सुरू
गोव्याचे बहुतांश आर्थिक व्यवहार पुन्हा सुरू झाले. आता केवळ कॅसिनो, सिनेमा, जीम, क्लबस वगैरे सुरू होणे शिल्लक आहे. सरकारने अद्याप कर्फ्यू ठेवलेला आहे, तो उठविता आलेला नाही. काही राज्य सरकारनी लॉकडाऊन मागे घेतले आहे.
दुकाने खुली करण्याची होती मागणाr
गेल्या दोन महिन्यांपेक्षाही जास्त काळ गोव्यात लॉकडाऊन आहे. तथापि केवळ जीवनावश्यक वस्तुंची दुकाने खुली ठेवण्यात आली होती. गेले दोन आठवडे व्यापारीवर्गाने जवळपास सर्वच दुकाने सरकारच्या परवानगीशिवाय सुरू केली होती. आणि सरकारने देखील कोणतीही कारवाई केली नव्हती. सोमवारपासून जवळपास अशंतः लॉकडाऊन मागे घेण्याची प्रक्रिया गोवा सरकारने सुरू केली.
गेल्या दोन आठवडय़ात कोरोना नियंत्रणात
गेले दोन आठवडे राज्यातील कोरोना पूर्णतः नियंत्रणात आला असून सोमवारी तर पूर्णतः नियंत्रणात आलेला दिसून आला. पुढील आठवडय़ात गोव्यातून कोरोनाचे जवळपास उच्चाटन झालेले दिसून येईल. नाही म्हणता अवघेच काही कोरोनाबाधित असतील. दगावणाऱया रुग्णांचे प्रमाणही शुन्यावर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हॉटेल्स, बार, रेस्टॉरंटसही झाली खुली
गोवा सरकारने सोमवारपासून खानावळी, हॉटेल्स, बार ऍण्ड रेस्टॉरंट तसेच अन्य व्यापारी आस्थापने सुरु करण्यास परवानगी दिल्यानंतर गेले कित्येक दिवस बंद असलेली जवळपास सर्वच हॉटेले सोमवारी सकाळी सुरू झाली. अद्याप काही हॉटेल चालकांनी नागरिकांना हॉटेलमध्ये प्रवेश दिला नसला तरी हॉटेलसमोर गजबज सुरू झाली. मोठय़ा प्रमाणात पोदेरांनाही त्यामुळे चांगले दिवस आले आणि हॉटेलमध्ये गरमागरम पावभाजीचा आस्वाद अनेकांनी घेतला.
सिनेमा, कॅसिनो, जीम, क्लब, कार्यक्रम बंदच
राज्यातील जनजीवनच पूर्णतः पूर्वपदावर आल्याचे सोमवारी जाणवले. सार्वजनिक कार्यक्रमांनाही आता लवकरच प्रारंभ होईल. कदाचित आणखी एका आठवडय़ाच्या कालावधीनंतर राज्यातील करमणुकीची केंद्रेही सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील आठवडय़ापासून राज्यातील जीम, सिनेमा, क्लब वगैरे सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोना संसर्ग कमी झाल्याने वातावरण पूर्वपदावर आले आहे.









