सातारा : विविध शालेय उपक्रमांमध्ये संपूर्ण राज्यात झालेल्या गुणांकनामध्ये सातारा जिल्ह्याने महाराष्ट्रातील एकूण छत्तीस जिल्ह्यांमध्ये दुसरा क्रमांक मिळवला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
प्रथम क्रमांक मुंबई जिल्ह्याचा असून, तो शहरी भाग आहे. संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्राचा विचार करता सातारा जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. शाळा सिद्धी, शालेय पोषण मध्यान्ह आहार, दिव्यांग विद्यार्थ्यांना सोयीसुविधा, यु-डायस, डायट, एस सी ई आर टी अशा विविध उपक्रमांना राज्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्याला गुणांकन देण्यात आले. सर्व जिल्ह्यांचे गुणांकन जिल्हा परिषद जिल्हा प्राप्त झाले आहे. हे संपुर्ण गुणांकन 600 पैकी आहे. शाळेची सुरक्षितता, विद्यार्थ्यांची सुरक्षितता, डिजिटल उपक्रम आदी अनेक बाबींना गुणांकन करण्यात आले असून 600 पैकी सातारा जिल्ह्याने 427.81 इतके गुण पटकावून दुसरा क्रमांक मिळवण्याचा बहुमान मिळवला आहे.
यामध्ये प्रशासकीय व्यवस्था, संपूर्ण शालेय नियंत्रण प्रणाली इत्यादी सर्वच बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. स्वाध्याय उपक्रमांमध्ये सुद्धा सातारा जिल्ह्याने नुकतेच धवल यश मिळवले होते. या संपूर्ण यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी, तसेच सर्व संबंधित अधिकारी शिक्षक इतर कर्मचारी तसेच सर्व उपक्रमांना सहकार्य करणाऱ्या आणि मनापासून आनंददायी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे देखील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले आहे.
कोरोनाच्या काळात सुद्धा ऑनलाईन शिक्षण प्रणाली आणि इतर उपक्रम अत्यंत यशस्वीपणे राबविले जात आहेत. संकटावर मात करीत कधी थेट भेटी तर कधी संगणक प्रणालीतून संपूर्ण शिक्षण व्यवस्था समाजापर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे, ही गोष्ट अभिमानास्पद आहे. शिक्षण थांबून उपयोग नाही. विद्यार्थ्यांचे नुकसान होता कामा नये, अशा दृष्टिकोनातून सातारा जिल्हा परिषद विविध उपक्रम राबवित असते. शिक्षण अधिकार्यांपासून केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, स्वतः शिक्षक, पालक आणि विद्यार्थी अशा सर्वच घटकांचा उत्कृष्ट प्रतिसाद असतो.