ऑनलाईन टीम / पुणे :
शालेय विद्यार्थ्यांसाठी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्यावीतने राज्यस्तरीय ऑनलाईन पोवाडा गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मोठ्या गटात वडगाव बुद्रुकचे चंद्रकांत दांगट पाटील विद्यालय तर छोट्या गटात पुण्यातील श्री माधव सदाशिव गोळवलकर विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
कै. शाहीररत्न किसनराव हिंगे यांच्या जयंतीनिमित्त अर्थात राष्ट्रीय शाहिरीदिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी ही स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली असून कसबा पेठेतील नामदेव शिंपी कार्यालयाच्या सभागृहात बक्षिस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. भारत सरकार विदेश मंत्रालय भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या क्षेत्रीय निर्देशक अनुजा चक्रवर्ती यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंत मावळे, शाहीर होनराज मावळे, सुरेश तरलगट्टी, अक्षदा इनामदार आदी उपस्थित होते. स्पर्धेचे परिक्षण ह.भ.प. मिलींदबुवा बडवे यांनी केले.
अनुजा चक्रवर्ती म्हणाल्या, आजकाल संस्था फंड मिळविण्यासाठी सुरू असतात, परंतु एखादा उद्देश समोर ठेवून मोफत काम करणाºया संस्था मोजक्याच आहेत. व्यासपीठावर येऊन कलेचे सादरीकण करण्यासाठी प्रोत्साहनाची गरज असते आणि ते प्रोत्साहन विद्यार्थ्यांना पोवाड्यातून मिळते. इतिहास समजून घेतला तर शाहिरीचे मूळ लक्षात येईल. विद्यार्थ्यांना इतिहास चांगला समजला तर त्यातून त्यांना प्रोत्साहन मिळेल, असे ही त्यांनी सांगितले.
शाहीर हेमंत मावळे म्हणाले, शालेय विद्यार्थ्यांना शाहीरी कला समजावी, महापुरूषांचा इतिहास कळावा आणि त्यातून त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने प्रबोधिनीच्यावतीने मोफत पोवाडा प्रशिक्षण वर्ग घेतले जाते. समाजातील प्रश्न जो पर्यंत आहेत तोपर्यंत शाहीरी कला जिवंत आहे. परंतु ते प्रश्न शाहिरांनी समाज आणि सरकारसमोर परखडपणे मांडले पाहिजे. ही कला जोपासण्याबरोबर स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचे प्रश्न परखडपणे मांडता यावेत यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असेही त्यांनी सांगितले.
- स्पर्धेचे निकाल :
मोठ्या गटात कै. केशवराव मोहनराव बाभुळगांवकर स्मरणार्थ वडगाव बुद्रुकच्या चंद्रकांत दांगट पाटील विद्यालयाला ३००० रुपये व स्मृतिचिन्हास प्रथम पारितोषिक मिळाले. कै. कृष्णाजी जोशी स्मरणार्थ पुण्याच्या सक्षम जाधव याला २००० रुपये व स्मृतिचिन्हास द्वितीय पारितोषक मिळाले, तर कै. शाहीर रविंद्र किसनराव हिंगे स्मरणार्थ पुण्यातील सानवी कुटे हिला १००० रुपये व स्मृतिचिन्हासह तृतीय पारितोषक मिळाले आहे.
छोट्या गटात कै. शाहीरमहर्षी आत्माराम पाटील स्मरणार्थ श्री. माधव सदाशिव गोळवलकर विद्यालय, पुणे यांना ३००० रुपये व स्मृतीचिन्हासह प्रथम पारितोषिक मिळाले. कै. शाहीरमहर्षी र.द.दिक्षीत स्मरणार्थ खोपोलीच्या शौर्य हेमंत निंबाळकर याला २००० रुपये व स्मृतीचिन्हासह द्वितीय पारितोषिक, तर कै. शाहीर जयराम गंगाधर नारगोळकर यांच्या स्मरणार्थ गोव्याच्या अवनी मांद्रेकर हिला १००० व स्मृतिचिन्हासह तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.








