ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कृषी विधेयकांवरून रविवारी राज्यसभेत झालेल्या गदारोळप्रकरणी महाराष्ट्रातील एका खासदारासह 8 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
टीमएमसीचे डेरेक ओब्रियन, डोला सेन, आम आदमी पक्षाचे संजय सिंह, काँग्रेसचे राजीव सातव, रिपून बोरा आणि सय्यद नासिर हुससैन, सीपीआय (एम)चे के के रागेश आणि एल्मलारन करीम अशी निलंबित सदस्यांची नावे आहेत.
कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी रविवारी शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, शेतकरी (सशक्तिकरण आणि संरक्षण) मूल्य आश्वासन तसेच कृषि सेवा विधेयक राज्यसभेत सादर केले होते. या विधेयकाला विरोधकांनी जोरदार विरोध करत वेलसमोर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर जोरदार घोषणाबाजी केली. तसेच नियमपुस्तिका फाडण्याचा आणि उपसभापतींसमोरील माईक तोडण्याचाही प्रयत्न झाला.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या निवासस्थानी रविवारी उच्चस्तरीय बैठक पार पडली. बैठकीनंतर महाराष्ट्रातील एका खासदारासह आठ सदस्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आठ दिवसांसाठी हे निलंबन असेल.