एका अतिरिक्त जागेसह 3 जागांवर विजय, काँगेसच्या पदरात केवळ 1
प्रतिनिधी/ बेंगळूर
अनेक दिवसांपासून उत्कंठा लागलेल्या राज्यसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. कर्नाटक विधानसभेतून राज्यसभेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे तीन तर काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाला आहे. विधानसभेतील सदस्य बळानुसार भाजपला दोन आणि काँग्रेसला एक जागा निश्चित होती. मात्र, खरी चुरस चौथ्या जागेसाठी होती. काँग्रेस आणि निजद यांच्यात समझोता न झाल्याने, तसेच निजदची काही मते फुटल्यामुळे ही चौथी जागा भाजपच्या पारडय़ात पडले. भाजपतर्फे केंद्रीयमंत्री निर्मला सीतारामन, अभिनेता जग्गेश आणि लेहरसिंग तसेच काँग्रेसचे जयराम रमेश राज्यसभेवर निवडून आले आहेत.
भाजपने आपल्या 2 निश्चित उमेदवारांसह लेहर सिंग यांनाही मैदानात उतरविले होते. तर काँगेसने माजी केंदीय मंत्री जयराम रमेश यांच्यासह व मन्सूर अली खान यांना तर निजदने कुपेंद्र रेड्डी यांना उमेदवारी दिली होती. चार जागांसाठी सहा उमेदवार रिंगणात होते. चौथ्या जागेसाठी काँग्रेस आणि निजद या दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यापैकी कोणत्याही पक्षाने माघार न घेतल्याने भाजपचे उमेदवार लेहरसिंग यांच्या गळय़ात विजयमाला पडली आहे. काँग्रेसचे दुसरे उमेदवार मन्सूर अली खान आणि निजदचे कुपेंद्र रेड्डी यांना पराभूत व्हावे लागले आहे.
प्रथम प्राधान्याच्या मतांपैकी भाजपच्या निर्मला सीतारामन यांना 46, जग्गेश यांना 44 आणि लेहर सिंग यांना 33 मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार जयराम रमेश यांना 44 मते मिळाली आहेत. निजदचे उमेदवार कुपेंद्र रेड्डी यांना 30 आणि काँगेसचे दुसरे उमेदवार मन्सूर अली खान यांना 25 मते मिळाली आहेत. कुपेंद्र रेड्डी यांना द्वितीय प्राधान्याचे एकही मत मिळाले नाही. तर काँग्रेसचे दुसरे उमेदवार मन्सूर अली खान यांना प्रथम प्राधान्याच्या 25 मतांबरोबरच काही द्वितीय प्राधान्याची मते मिळाली. पण, त्यांना विजय मिळाला नाही. विधानसभेत भाजपजवळ 120, काँग्रेसकडे 69 आणि निजदकडे 32 आमदार आहेत. तीन अपक्ष आमदार असून त्यापैकी नागेश आणि एन. महेश यांनी भाजपला तर शरत बच्चेगौडा यांनी काँग्रेसला मत दिल्याचे समजते.
रेवण्णांचे मत वैध ः भाजप, काँग्रेसची तक्रार फेटाळली
माजी मंत्री आणि निजद नेते एच. डी. रेवण्णा यांचे मत अवैध ठरविण्यासंबंधी भाजप आणि काँग्रेसच्या आमदारांनी निवडणूक अधिकाऱयांकडे केली होती. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने ही तक्रार फेटाळत रेवण्णा यांचे मत वैध असल्याचा आदेश दिला. मात्र, हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेल्याने मतमोजणीला दोन तास विलंबाने सुरुवात झाली. निवडणुकीवेळी रेवण्णा यांनी काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांना बॅलेट पेपर दाखवून मतदान केले आहे, असा आरोप करण्यात आला. मतदानाच्या गुप्ततेच्या नियमाचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे रेवण्णांचे मत अवैध ठरवावे, अशी तक्रार निवडणूक अधिकारी विशालाक्षी यांच्याकडे करण्यात आली होती. विशालाक्षी यांनी सीसीटीव्ही फुटेज व इतर पडताळणी करून यासंबंधीचा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला दिला. त्यानंतर आयोगाने रेवण्णांचे मत वैध ठरविले.
सिद्धरामय्यांची रणनीती फसली?
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी आपल्या पक्षाचा दुसरा उमेदवार (मन्सूर अली खान) मागे न घेता निजदला आव्हान दिले. त्यामुळे निजदचे उमेदवार कुपेंद्र रेड्डी यांच्या मार्गात अडसर निर्माण झाला. निजदमधील असंतुष्ट आमदारांना गळाला अडकवून मन्सूर अली खान यांना निवडून आणण्यासाठी सिद्धरामय्यांनी रणनीती आखली होती. परंतु, निजदमधील केवळ एकाच आमदाराने काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केले. तर निजदमधील आणखी एका आमदाराने भाजपचे तिसरे उमेदवार लेहरसिंग यांना मत दिल्याचे मतमोजणीनंतर स्पष्ट झाले आहे. निजदचे आमदार फोडण्याचे सिद्धरामय्या यांचे प्रयत्न फसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
निजदमधील दोघांचे क्रॉस वोटींग
निजदमधील पाच ते सहा असंतुष्ट आमदार बंडखोरी करू शकतील, असे अनेकांचे म्हणणे होते. परंतु, दोघांनीच दुसऱया पक्षातील आमदारांना मते दिली आहेत. कोलारचे आमदार श्रीनिवास गौडा यांनी काँग्रेसला तर तुमकूर जिल्हय़ातील गुब्बीचे आमदार श्रीनिवास यांनी भाजपला मत दिल्याचे समजते.









