प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करवीर निवासिनी अंबाबाईच्या साक्षीने मंत्री यड्रावकर यांना शिवबंधन बांधले.
ऑक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे असणाऱया मंत्री यड्रावकर यांनी अपक्ष म्हणून लढताना शिरोळ विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार उल्हास पाटील यांना पराभूत केले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता.
ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकारमध्ये यड्रावकरांना मंत्रीपदाची संधी मिळाली; पण यड्रावकर प्रत्यक्षात शिवसेनेत नव्हते. आता त्यांनी अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्हय़ात शिवसेनेच्या आमदारांची संख्या आता दोन झाली आहे. यड्रावकर यांच्या पक्षप्रवेशावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार निवेदिता माने, देवस्थान समिती सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते.
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या सारख्या कार्यकर्त्यावर विश्वास टाकून मंत्रीपद दिलेच तसेच शिवसेनेतही कार्य करण्याची संधी दिली आहे. त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे.
-राजेंद्र पाटील-यड्रावकर, आरोग्यराज्यमंत्री