माजी आमदार मोहन आमशेकर यांचे समर्थन
प्रतिनिधी / फोंडा
zदेशाच्या उत्तरपूर्व सिमावर्ती भागातून होणारी घुसखोरी व तेथील इतर प्रश्न हाताळण्यासाठी सत्यपाल मलिकसारख्या राज्यपालांची गोव्यापेक्षा तेथे जास्त गरज होती. त्यामुळेच केंद्र सरकारने त्यांची मेघालयात बदली केली आहे. त्याला राजकीय अर्थ लावणे हा बालीशपणा आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार मोहन आमशेकर यांनी व्यक्त केली आहे.
काश्मिरचे राज्यपाल असताना सत्यपाल मलिक यांनी कलम 370 रद्दबातल करताना तेथील सामाजिक प्रश्न ज्या पद्धतीने हाताळला ते पाहता मेघालयातील परिस्थितीही ते योग्यप्रकारे हाताळू शकतील. या कारणामुळेच त्यांची मेघालयात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीच्या विरोधात जाहीर वक्तव्ये करताना राजकीय नेत्यांनी मूळ विषय समजून घेणे गरजेचे आहे. राज्यपाल मलिक यांनी आपल्या काही जाहीर विधानामुळे सरकारला अडचणीत आणले होते व त्यामुळेच त्यांची बदली करण्यात आली, हा विरोधकांचा आरोप अत्यंत हास्यास्पद असल्याचे मोहन आमशेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. राज्यपाल हे मुळात घटनात्मक पद असून केंद्र व राज्य सरकारमधील तो दुवा असतो. मात्र संसदीय लोकशाही पद्धतीत उठसुट प्रत्येक प्रश्न राज्यपालाकडे नेणे योग्य नाही. सत्यपाल मलिक यांना जनतेच्या प्रश्नाची जाणीव आहे व त्यामुळेच ते राजकीय नेत्यांचे खुल्या दिलाने ऐकून घेत होते. मात्र याचा अर्थ राज्यातील प्रत्येक प्रश्न हा राज्यपालांकडे नेणे उचित नाही. निदान अनेक वर्षे गोव्याच्या राजकारणात असलेल्या अनुभवी नेत्यांना ते कळायला हवे होते, असे आमशेकर म्हणाले. राज्यातील विविध प्रश्न हाताळण्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे नेतृत्व सक्षम आहे व ते सोडविण्यास लोकनियुक्त सरकार समर्थ आहे, असेही ते म्हणाले.