नवी नियुक्ती थेट मेघालयात : स्पष्टता, गोव्याचे हित सांभाळणे पडले महागात : महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे गोव्याची जबाबदारी
प्रतिनिधी / पणजी
राज्यपाल सत्यपाल मलिक व मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यामधील संघर्षाची अखेर राज्यपालांच्या बदलीने झाली. सत्याची कास धरणारे राज्यपाल मलिक यांची मंगळवारी सकाळी राष्ट्रपतींच्या एका आदेशाने तडकाफडकी बदली करून त्यांना थेट मेघालयात पाठविण्यात आले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे गोव्याचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला आहे. या घटनेने विरोधी पक्ष प्रक्षुब्ध झाला असून सरकारवर टीकेची झोड उठविली आहे.
आठ महिन्यांपूर्वी राज्यपालपदाची शपथ ग्रहण करून राज्यात राज्यपाल देखील महत्वाची भूमिका बजावित असतात हे दाखविणारे, कोणत्याही पक्षाची वल्कले न लावता निःपक्षपातीपणे काम करणारे आणि सत्याच्या बाजूने राहणारे राज्यपाल सत्यपाल मलिक यांना त्यांचा स्पष्टपणा महागात पडला. गोव्यातून त्यांना हटविण्यात येऊन पूर्वोत्तर राज्यात मेघालयाचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
सरकारची जाहीरपणे केली कानउघाडणी
राज्यपालपद स्वीकारल्यापासून सत्यपाल मलिक आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यादरम्यान वाद सुरू होता. तीनवेळा तर राज्यपालांनी सरकारला चांगलेच सुनावले होते. सरकारचा कोणताही मुलाहिजा न राखता जाहीरपणे केलेली कानउघडणी त्यांच्या बदलीस कारणीभूत ठरली आहे.
नवे राजभवन उभारणीवरुन मतभेद
राज्यपालांना गोव्यातून हटवा, अशी तीनवेळा सरकारतर्फे केंद्राकडे मागणी करण्यात आली होती. गेल्या महिन्यात मंत्रिमंडळ बैठकीत नवे राजभवन उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यासाठी 8 कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र कोरोना महामारीमुळे काटकसर करण्याचा सल्ला सरकारला या पूर्वीच दिलेल्या सत्यपाल मलिक यांनी लेखी निवेदन जारी करून तात्पुरती काही प्रमाणात राजभवनची दुरुस्ती करा आणि नव्याने राजभवन उभारू नका, आर्थिक परिस्थिती सुधारली की मग निर्णय घ्या, असे सूचविल्याने प्रमोद सावंत सरकारला धक्काच बसला होता. त्यानंतर पुन्हा एकदा राज्यपालांना हटविण्याची मागणी दिल्लीत करण्यात आली होती.
राज्यपालांना बोलविले होते दिल्लीत
या प्रकारानंतर राज्यपालांना नवी दिल्लीत बोलाविण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते ऍड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी 15 दिवसांपूर्वी राज्यपालांच्या बदलीचे भाकित व्यक्त करून तसे वृत्त त्यांनी प्रसारमाध्यमांनाही पोहोचविले होते. त्यांचे ते भाकित खरे ठरले.
कोरोनाबाबत व्यक्त केली होती चिंता
दि. 8 नोव्हेंबर 2019 रोजी सत्यपाल मलिक यांनी गोव्याच्या राज्यपालपदाची सूत्रे हाती घेतली होती. मात्र त्यानंतर आलेल्या कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत त्यांनी जाहीरपणे चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे राज्यपाल मलिक हे राज्य सरकारच्या विरोधात गेल्याचा आभास निर्माण करण्यात आला. त्यांनी सरकारला कोरोनाच्या बाबतीत गांभीर्याने पावले उचला, असा आदेश वेळोवेळी दिला होता.
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाने राज्यपाल नाराज
मांगोरहिल वास्को भागात कोरोना फैलावण्यास सुरुवात झाली, त्यावेळी संपूर्ण वास्को सील करा, अशी जनतेची मागणी होती. त्या मागणीत राज्यपालांनीही सूर मिसळले होते. मात्र तरीही मुख्यमंत्र्यांनी वास्को बंद करण्याचा निर्णय घेतला नसल्याने राज्यपाल सत्यपाल मलिक नाराज बनले होते. त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. त्याची परिणती म्हणून मंगळवारी त्यांच्या बदलीचा आदेश निघाला. सत्यपाल मलिक यांना थेट मेघालयात पाठविण्यात आले.
विरोधीपक्ष, जनतेकडून सरकारवर टीका
राज्यपाल सत्यपाल मलिक यांना गोव्यातून तातडीने हटविण्यामागे षडयंत्र असल्याची टीका विरोधी पक्षांच्या विविध नेत्यांनी व्यक्त केली आहे. समाज माध्यमातून तर सरकारवर समाजसेवकांनी अक्षरशः आसूड ओढलेले आहेत. राज्यपालांनी सत्याची बाजू स्वीकारली म्हणून सरकारने त्यांना हटविले असा सूर संपूर्ण गोव्यात उमटला. जनतेमध्ये देखील असेच वातावरण निर्माण झाले आणि राज्यपालांच्या बदलीचे संतप्त पडसाद समाजमाध्यमातून उमटले.
पुन्हा नाचक्की टाळण्यासाठीच राज्यपालांची बदली ः काँग्रेस
काँग्रेस पक्षाने सोमवारी भाजप व ड्रग्जमाफिया यांचे सबंध असल्याचे पुराव्यासकट उघड केल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची राज्यपालांकडून परत एकदा होणारी नाचक्की टाळण्यासाठीच राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या तडकाफडकी बदलीचा आदेश काढण्यात आला, असा दावा काँग्रेस गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे. राजभवनाचे कॅसिनो भवन करण्याचा अजेंडा पुढे रेटणे हे सुद्धा राज्यपालांची बदली करण्यामागचे कारण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ’ना खाऊंगा ना खाने दुंगा’ ही केवळ पोकळ घोषणा असल्याचे सांगून, भ्रष्टाचाराला थारा न देता रामराज्य आणण्याचा भाजपचा दावा आज जमिनदोस्त झाला असल्याची टीकाही चोडणकर यांनी केली आहे. ड्रग्जमाफिया प्रकरणाची राज्यपालांनी गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश देण्यासाठी पावले उचलली होती. त्याचा सुगावा लागल्यानेच प्रधानमंत्री कार्यालय व गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून सत्यपाल मलिक यांचा बदली आदेश काढण्यात आला असल्याचा दावा चोडणकर यांनी केला आहे.
राज्यपालांच्या बदलीमागे षडयंत्र नाही ः लोबो
म्हापसा ः राज्यपाल सत्यपाल मलिक एकेकाळचे ज्ये÷ राजकारणी असून गोव्यातील राजकीय प्रवाहात राहाणे त्यांना पसंत पडायचे. ते एक चांगले व्यक्तीमत्व आहे, आपण त्यांना सुयश चिंतितो, असे ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो यांनी कळंगुटमध्ये मंगळवारी आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. राज्यपालांच्या बदलीमागे कुठल्याही प्रकारचे षडयंत्र नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला आहे.
गोवा, गोमंतकीय नेहमीच माझ्या हृदयात : सत्यपाल मलिक
पणजी/ प्रतिनिधी
मावळते राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गोव्यातून निघताना राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. सायंकाळी जारी केलेल्या संदेशात राज्यपाल म्हणतात की गोव्यामध्ये गेले दहा महिने राहून जनतेमध्ये सहभागी होताना जनतेकडून मिळालेला प्रचंड प्रतिसाद आणि जनतेने दिलेले उदंड प्रेम आपण कधीही विसरू शकत नाही. गोवा हा स्वतः निसर्गसंपन्न आणि अतिशय सुंदर प्रदेश आहे. येथील जनतेचे राहणीमान व येथील जनता आणि त्यांचे स्वतंत्र असे अस्तित्व आहे. हे सर्व पाहून आपण बेहद्द खूश झालो होतो. राज्यातील जनता तसेच हे राज्य आपल्या नेहमीच हृदयात साठून राहील. आपण बुधवारी सकाळी येथून निघत आहे. आपण अधूनमधून गोव्याला भेट देण्यासाठी अवश्य येईन. त्याचबरोबर सर्वांना समृद्धी प्राप्त होईल अशी प्रार्थना आपण करतो. गोव्यातील जनता सामाजिक सलोख्याने अशीच मजबूत राहिल असे राज्यपालांनी पुढे म्हटले आहे.
दरम्यान राज्यपालांनी आपल्या संदेशात राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत परंतु या सरकारचा किंवा मुख्यमंत्र्याचा कुठेही उल्लेख देखील त्यांनी केलेला नाही हे यातून स्पष्ट होते.
सत्य व भाजप यांची सांगड : बसू शकत नाही : कामत
प्रतिनिधी / मडगाव
सत्याचे पालक गोव्याचे आदरणीय राज्यपाल मलिक यांनी गोमंतकीयांच्या भावना व अस्मितेचा आदर करत म्हादई, अर्थव्यवस्था व खर्च कपात, कोविड हाताळणी या विषयांवर गोमंतकीयांचे हित जपले. मात्र सत्य व भाजप यांची सांगड बसू शकत नाही, त्यामुळेच राज्यपालांचा बदली आदेश निघाला असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.
गोवा व गोमंतकीयांना त्यांच्या मार्गदर्शनाची जेव्हा अत्यंत गरज होती, त्याचवेळी त्यांची बदली होणे हे खरेच दुःखाची बाब आहे. त्यांनी नेहमीच गोव्याच्या भल्यासाठी निर्णय घेतले. सामान्य माणसांचा आदर करणे व पर्यावरण व निसर्गाची राखण करणे अशी त्यांची नेहमीच भावना होती. राज्याच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेबद्दल त्यांना नेहमीच चिंता होती व ते खर्चकपात करा व वायफळ खर्च बंद करा असा सरकारला नेहमी सल्ला देत होते.
गोमंतकीयांच्या हृदयात त्यांनी स्थान निर्माण केले असून, गोवा त्यांना नेहमीच अभिमानाने व आदराने पाहणार आहे. त्यांच्या बदलीच्या आदेशाने प्रत्येक गोमंतकीयाला धक्काच बसला आहे. आपण त्यांना उत्तम आरोग्य, आनंद व आयुष्य लाभो अशा शुभेच्छा देतो अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केली आहे.









