वृत्तसंस्था/ कोलकाता
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांनी रविवारी संध्याकाळी राजभवन येथे राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर गांगुली हे भाजपमध्ये सामील होण्यासंबंधीचे कयास वर्तविण्यात येत आहेत. तर सौरव यांनी याला सौजन्याची भेट ठरविले आहे.
सौरव यांनी रविवारी संध्याकाळी सुमारे 4.30 वाजता राज्यपाल यांची भेट घेतली असून दोघांदरम्यान तासभर चर्चा झाली आहे. सौरव वैयक्तिक कारणांसाठी भेटीला आले होते, याचे राजकारणाशी कुठलेच देणेघेणे नसल्याचे राजभवनाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. राजकारणात उतरण्याची सध्यातरी योजना नसल्याने सौरव यांनी अनेकदा सांगितले आहे. सौरव यांनी ईडन गार्डन स्टेडियमला भेट देण्याचे आमंत्रण दिल्याचे राज्यपालांनी ट्विट करत म्हटले आहे.
पश्चिम बंगाल भाजप सौरव यांना पक्षात सामील करण्यासाठी पूर्ण जोर लावत आहे. राज्यात ‘दादा विरुद्ध दीदी’ अशी थेट लढाई निर्माण करण्याची भाजपची मनीषा आहे. तर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी सौरव यांचे अत्यंत उत्तम संबंध आहेत. सौरव यांना बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद करण्यात ममतांची मोठी भूमिका राहिली आहे. याचप्रकारे सौरव यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशीही उत्तम संबंध आहेत.
शाह यांच्या समर्थनामुळेच गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष झाल्याचे मानले जाते. बीसीसीआयचे सचिव जय शाह हे गृहमंत्र्यांचे पुत्र आहेत. सौरव यांनी काही दिवसांपूर्वी माकप नेते अशोक भट्टाचार्य यांच्या पुस्तकाचे प्रकाशन केले होते.









