मुंबई/प्रतिनिधी
१२ आमदारांच्या नियुक्तीचा वाद अद्यापही मिटलेला नाही. काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांची भेट घेऊन १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती. पण अद्यापही राज्यपालांनी याबाबत निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, १२ आमदारांच्या नियुक्तीवरून सत्ताधारी पक्ष राज्यपालांवर वारंवार टीका करताना दिसत आहे. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली आहे.
१२ आमदारांच्या नियुक्तीसंदर्भातील प्रस्तावावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अद्याप स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळे या आमदारांची नियुक्ती रखडली आहे. यावरून आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली. राज्यपालांना सही करण्याचाच प्रॉब्लेम आहे, असं राऊतांनी म्हटलंय. तसेच वर्ष उलटूनही या आमदारांची नियुक्ती का रखडली आहे, याची कारणं भाजपा नेत्यांनी आम्हाला सांगावी, असंही राऊत म्हणाले.