मुंबई / प्रतिनिधी
निवडणुकीसाठी राज्यपाल कोश्यारींनी परवानगी दिलेली नाही त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. निवडणुकविषयक कायदेशीर बाबींचा अभ्यास करुनच निर्णय घेऊ असे सांगून राज्यपालांनी कायदेशीर मुद्दे उपस्थित केले आहेत. राज्यपालांच्या या भुमिकेनंतर संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना यावरुन खोचक टोला लगावला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाठवलेले उत्तर तुमच्या समोर आहे. राज्यपालांनी एवढा अभ्यास करु नये असे मी यापूर्वी देखील म्हणाला होतो. घटनेमध्ये ज्या तरतुदी आहेत त्यानुसार काम करण्यासाठी राज्यपालांची नेमणुक केली जाते. विधानसभेचे हक्क, सरकारच्या शिफारसी, लोकभावना डावलून काम करण्यासाठी राज्यपालांची नियुक्ती केली जात नाही. राज्यपाल अभ्यासू, विद्वान आहेत. मात्र त्या अभ्यासाचे आणि विद्वत्तेचे अजीर्ण व्हायला नको. महाराष्ट्राच्या राजभवनामध्ये अभ्यासाचे अजीर्ण होत असल्याचे चित्र दिसत आहे. अजीर्ण झाल्यावर पोटदुखीचा त्रास सुरु होतो. जर काही लोकांना असा त्रास झाला असेल तर महाराष्ट्राचे आरोग्य खाते हे सक्षम आहे. ते उपचार करतील असा टोला देखील राऊतांनी राज्यपालांना लगावला आहे.








