प्रतिनिधी /वास्को
माजी सभापती व भाजपाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र आर्लेकर सोमवारी दुपारी हिमाचल प्रदेशकडे रवाना झाले. आज मंगळवारी सकाळी 10 वा. त्यांचा हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी शपथवीधी होणार आहे. गोमंतकीयांसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. मुख्यमंत्री, मंत्री, आमदार व भाजपाच्या नेत्यांनी त्यांना खास निरोप देण्यासाठी खास उपस्थिती लावली होती.
राजेंद्र आलेंकर त्यांचे कुटुंबिय, दोघे सहाय्यक व वास्को भाजपा गट अध्यक्ष दीपक नाईक, युवा गट अध्यक्ष गौरीष नाईक तसेच रूपेश पालयेकर अशा कार्यकर्त्यांच्या सोबतीने मंगळवारी दुपारी हिमाचल प्रदेशकडे रवाना झाले. तत्पूर्वी झुआरीनगर वास्को येथील निवासस्थानी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपा प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, खासदार विनय तेंडुलकर, मंत्री मिलिंद नाईक, आमदार कार्लुस आल्मेदा, माजी खासदार ऍड. नरेंद्र सावईकर, पक्षाचे संघटनमंत्री सतिष धोंड, माजी आमदार दामोदर नाईक, पक्षाचे खजिनदार संजीव देसाई आदींनी राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांनी त्यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानीत केले. तसेच राज्य सरकार व गोमंतकीय जनतेच्यावतीने त्यांना राज्यपाल म्हणून भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा व निरोप दिला.
राजेंद्र आर्लेकर हे राज्यपालपदी निवडले गेलेले तिसरे सभापती असून आज मंगळवारी दुपारी सकाळी 10 वा. त्यांचा हिमाचल प्रदेशमच्या राजभवनावर राज्यपालपदी शपथविधी होणार आहे. गोमंतकीयांसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.









