रघुनाथदादा पाटील यांची टीका, भगवान काटे, प्रा. जालंदर पाटील `बाजार समिती’ कारभारावर का बोलत नाहीत?
प्रतिनिधी/कोल्हापूर
दूध दरवाढीसाठी आंदोलन करून दूध उत्पादकांच्या हितापेक्षा दूध संघ वाल्यांचे हित पाहणारे माजी खासदार राजू शेट्टी हे दूध संघवाल्यांचे पंटर आहेत, अशा शब्दात शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत टीका केली. तसेच शेतकरी नेते असणारे व बाजार समितीचे आजी-माजी संचालक भगवान काटे व प्रा.जालंदर पाटील हे बाजार समितीच्या कारभारावर का बोलत नाहीत, असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या मल्टिपर्पज हॉल येथे शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
रधुनाथदादा म्हणाले, उत्पादकांच्या दुधाला अपेक्षित भाव न देणाऱया दुध संघांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासारखा पंटर तयार केला आहे. दुध दरवाढ आंदोलन केल्यानंतर तडजोडीसाठी त्यांच्यासारखीच माणसं दुधसंघवाल्यांनी पुढे आणली. यामुळे दुध उत्पादक शेतकऱयांवर अन्याय झाला आहे. शेतकऱयांसाठी काम करणाऱया लोकांना मते मिळू नयेत, अशी व्यवस्था पैसेवाल्या पुढाऱयांनीच केली आहे. सरकारने अडमुक्त व्यापार असा कायदा केला. परंतु बाजार समिती व व्यापाऱयांकडून त्याचे उल्लंघन होत आहे. अडत, हमाली व तोलाईदारांची रक्कम ही बिलात ऍडव्हान्स म्हणून शेतकऱयाकडून कापून घेतली जात आहे. आपलेच लोक आपल्याला फसवत आहेत. शेतकरी नेते असणारे माजी संचालक भगवान काटे व सध्या संचालक असणारे प्रा. जालंदर पाटील हे बाजार समितीच्या कारभारावर काहीच बोलत नाहीत, हे दुर्देवी आहे.
ते पुढे म्हणाले, महापुरासाठी अनेकजण अनेक कारणे सांगतात. यामध्ये पाऊस जादा पडला हे प्रमुख कारण सांगितले जाते. परंतु हे पूर्णसत्य नाही. कारण राष्ट्रीय महार्गाची भराव टाकून वाढविलेल्या उंचीमुळे पुराचे संकट ओढवले आहे. काही जण म्हणतात नदीत भिंत बांधली पाहीजे परंतु ही वक्तव्ये बालिशपणाची आहेत. अशा भिंती बांधून पूर थांबणार नाही. तर नद्यांवरील पुलांच्या कमानी विस्तारीत करुन त्याची संख्या वाढविली पाहीजे. त्यामुळे कोल्हापूर व सांगली जिह्यातील गावांना पूराचा धोका कमी होऊ शकतो.
यावेळी जिल्हाध्यक्ष ऍड. माणिक शिंदे, खंडेराव घाटगे, संजय रावळ, टी.आर. पाटील, बाळ नाईक, संभाजी भोसले, अनिता जाधव, अनिता निकम, प्रतिक कुलकर्णी, शंकर बावडेकर, नाभिराज देसाई, आदम मुजावर, डी. के. कोपार्डेकर, वैशाली मोरे आदी उपस्थित होते.
भाजप, काँग्रेसच्या राज्यकर्त्यांकडून जंगलांचा सत्यानाश
भाजप व काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी आपल्या सरकारच्या कार्यकाळात जंगलांचा सत्यानाश केला. वृक्षतोडीने जंगले सपाट होऊन तेथील माती, दगड, धोंडे हे धरणांमध्ये येऊन प्रचंड गाळ झाला आहे. असेच राज्यकर्ते मिळत गेल्यास सर्व धरणे गाळांनी भरुन भविष्यात शेतीलाही पाणी मिळणार नाही, अशी टीका रघुनाथदादा यांनी केली.
पंतप्रधान मोदींनी शेतकर्यांचा विश्वासघात केला
रघुनाथदादा पाटील म्हणाले, शेतकर्यांना उत्पादन खर्च अधिक 50 टक्के जादा भाव देऊ, अशी घोषणा करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 ची निवडणूक जिंकली. त्यांना देशभरातील शेतकर्यांनी मते दिली. परंतु त्यांनी या घोषणेचे पालन न करता सर्वांचा विश्वासघात केला.









