दख्खनचा राजा जोतिबाला साकडे घालून यात्रेस सुरवात
प्रतिनिधी / जयसिंगपूर
घटाची स्थापना करून ख-या अर्थाने सत्य आणि असत्याची लढाई सुरू होते व विजयादशमी दस-या दिवशी सत्याचा विजय होतो. यामुळे शेतकऱ्यांना एक रक्कमी एफ.आर.पी देण्याची सुबुध्दी केंद्र व राज्य सरकारला द्यावी आणि एक रक्कमी एफ.आर.पी च्या या संघर्षाला आम्हाला या सर्व शक्तीपीठांनी शक्ती द्यावी यासाठी आजपासून दख्खनचा राजा जोतिबाला साकडे घालून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेटटी यांनी ‘जागर एफ.आर.पी चा व आराधना शक्तीपीठांची’ या यात्रेस सुरुवात केली.
केंद्र सरकारच्या निती आयोग व कृषी मुल्य आयोगाने एफ.आर.पी तीन टप्यात देण्यासंदर्भात शिफारस केली आहे. यांसदर्भात देशातील पंधरा राज्याकडून अभिप्राय मागविण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने तीन टप्यात एफ.आर.पी ला पाठिंबा देत ही एफ.आर.पी देत असताना पहिला हप्ता म्हणून ६० टक्के रक्कम ऊस गाळप झाल्यानंतर एक महिन्यांनी, दुसरा हप्ता २० टक्के कारखाना गाळप बंद झालेनंतर, व शेवटचा २० टक्केचा तिसरा हप्ता पुढील गळीत हंगाम सुरू होण्याआधी द्यावा अशी शिफारस करून केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार व साखर कारखानदार यांना सुबुध्दी येऊ दे यासाठी राज्यातील सर्व शक्तीपीठांना साकड घालून आराधना करण्यात येणार आहे.
आजपासून जोतिबा येथून सुरवात झालेल्या ही यात्रा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, तुळजापूर, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, पुणे व सातारा जिल्ह्यातील शक्तीपीठांना साकडे घालून दस-यादिवशी या यात्रेचा शेवट होणार आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील , सावकर मादनाईक, जयकुमार कोले , वैभव कांबळे , जनार्दन पाटील , विठ्ठल मोरे , संदीप कारंडे , राजेश पाटील , राम शिंदे यांचेसह स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते.
देशातील मुठभर साखर कारखानदारांनी केंद्र सरकारकडे ही मागणी केल्यानंतर केंद्राने तातडीने याबाबत अमलबजावणी करण्यासंदर्भात पाऊले उचलली याकरिता तीनवेळा देशातील खासगी व सहकारी साखर कारखानदारांची बैठक घेतली. मात्र या बैठकीस शेतकरी प्रतिनिधी यांना बोलवावे असे वाटले नाही. पर्यायाने देशातील सर्वच राजकीय पक्ष या निर्णयाला पाठिंबा दिल्याने देशातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
Previous Articleराजीव पांडे यांची एन.आय.ए.त नियुक्ती
Next Article शहरात दुर्गामूर्तीचे उत्साहात स्वागत








