लांजा पोलिसांना सापडली चिठ्ठी, नाजूक हितसंबंधांचा उल्लेख
प्रतिनिधी / लांजा
लांजा शहरातील राजू कोवळे या युवकाने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. मात्र त्यामागील कारण गुलदस्त्यातच होते. आता या प्रकरणी पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. यामध्ये नाजूक हितसंबंधांचा उल्लेख असल्याने तपासाला नवी दिशा मिळाली असून लवकरच याप्रकरणातील गूढ उकलण्याची शक्यता आहे.
राजू कोवळे यांच्या आत्महत्येनंतर आढळलेल्या चिठ्ठीमध्ये नाजूक हितसंबंधांचा उल्लेख असून तिघांची नावे असल्याचे समजते. जवळच्या व्यक्तीने मानसिक त्रास दिल्याचाही चिठ्ठीत उल्लेख आहे. या चिठ्ठीमुळे पोलीस तपासाला मोठा आधार प्राप्त झाला आहे. पोलिसांनी चिठ्ठीमधील मजकुराप्रमाणे तपास सुरू केला आहे.
कोवळेच्या मित्र परिवाराने या मृत्यूप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे. राजू काही दिवसांपासून मानसिक दबावाखाली होता असे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. दरम्यान, कारवाईच्या भीतीने काहीजणांनी अटकपूर्व जामीनसाठी हालचाली सुरू केल्याचेही समजते.









